वाहनमालकांसोबत वाहतूक पोलिसांचा करार नाही

ठाणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वापरली जाणारी टोइंग वाहने सातत्याने विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतानाच आता या टोइंग वाहनांच्या मालकांसोबत वाहतूक पोलिसांनी कोणताही करार केला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे, निविदा प्रक्रियेविनाच टोइंग वाहन वाहतूक पोलिसांच्या सेवेत दाखल करण्यात आल्याचेही या प्रकरणातून पुढे आले आहे.

ठाणे शहरामध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण रस्त्यांवरच दुचाकी उभ्या करतात. मात्र, या दुचाकी वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. टोइंग वाहनाच्या साहाय्याने वाहतूक पोलीस दुचाकी उचलून नेतात आणि त्यानंतर दंड आकारून दुचाकी सोडून देतात.

रस्त्यावरील दुचाकी उचलण्यापूर्वी टोइंग वाहनावरील पोलीस कर्मचाऱ्याने उद्घोषणा करणे अपेक्षित असतानाही शहरामध्ये या नियमाचे मात्र पालन होत नसल्याची ओरड नागरिकांकडून होते. तसेच टोइंग वाहनांवरील खासगी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीच्या मुद्दय़ावरून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले असून यापैकी काही प्रकरणांत गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असतानाच या टोइंग वाहनांच्या मालकांसोबत वाहतूक पोलिसांनी कोणताही करार केला नसल्याचे तसेच निविदा प्रक्रियेविनाच ही वाहने सेवेत दाखल करून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती अधिकारामध्ये वाहतूक पोलिसांना काही प्रश्न विचारले होते. त्यामध्ये टोइंग वाहनांचे कंत्राट देताना कंपन्यांसोबत करण्यात आलेला करारनामा आणि निविदा प्रक्रिया राबविताना कंत्राटदारांनी सादर केलेली माहिती याबाबत विचारणा केली होती. या प्रश्नाचे उत्तर देताना वाहतूक पोलिसांनी टोइंग वाहनांच्या मालकांकडून सेवा उपलब्ध करून घेण्यात येते, असे म्हटले आहे.

त्यामुळे शहरातील दुचाकींवर कारवाई करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टोइंग वाहनांच्या मालकांसोबत वाहतूक पोलिसांनी कोणताही करार केला नसल्याचे आणि या वाहनांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली नसल्याची बाब उघड झाली आहे. तसेच यंदाच्या वर्षांपासून टोइंग मालकांसोबत करार करण्यास सुरुवात केल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिल्याचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

शहरामध्ये यापूर्वी टोइंग वाहने कशा प्रकारे चालविली जात होती, याबाबत माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. मात्र, वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यानंतर टोइंग वाहन मालकांसोबत करार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आम्ही टोइंग वाहनांच्या सेवेसाठी कोणताही खर्च करीत नसल्यामुळे निविदा काढण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांनी निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे ज्यांना ही सेवा देणे परवडते, त्यांनाच ही कामे दिली जातात,

अमित काळे, उपायुक्त ठाणे वाहतूक पोलीस शाखा