पाचव्या, सहाव्या मार्गिकेवरून कळवा ते दिवा धिमी वाहतूक
ठाणे : ठाणे ते दिवा या पाचव्या सहाव्या मार्गिकेतील कळवा ते दिवा पट्टय़ादरम्यान आज लोकलची धिमी वाहतूक सुरू करण्यात आली. या मार्गिकेवरील मुंब्रा रेतीबंदर येथून सुमारे दीड किलोमीटर अंतर असलेल्या खाडीवरून रेल्वेगाडी धावू लागल्याने प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसलाच; पण बाहेर दिसणारे नयनरम्य दृश्य पाहून प्रवासी अधिक सुखावले. हा बदल होत असताना दुसरीकडे रेल्वेगाडय़ांना वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने गाडय़ा धावत होत्या.
ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ही पाचवी आणि सहावी मार्गिका मुंब्रा रेतीबंदर खाडीकिनाऱ्यावरून जाते. १. ४ किलोमीटर लांब ही उन्नत मार्गिका आहे. रविवारी या उन्नत मार्गिकेवरून रेल्वेची वाहतूक करणे योग्य होईल का याची चाचपणी करण्यात आली. ही चाचपणी यशस्वी झाल्याने सोमवारी पहाटेपासूनच धिम्या रेल्वेगाडय़ांची वाहतूक या उन्नत मार्गिकेवरून सुरू करण्यात आली. रेतीबंदर येथील खाडीवरून अचानक रेल्वेगाडीची वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी चकित झाले होते. रेल्वेगाडीच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांकडून खाडीतील पक्षी, कांदळवन, किनाऱ्यांचे निसर्गरम्य दृश्य मोबाइलमध्ये टिपले जात होते. तर काही प्रवाशांनी १.४ किलोमीटरच्या प्रवासाचे चित्रीकरण मोबाइलमध्ये साठविण्यास सुरुवात केली. खाडीवरून रेल्वेगाडी धावू लागल्याने हवेतील गारवा अनुभवताना खूप आनंद झाला असे सुशील वीर या प्रवाशाने सांगितले. कळवा ते दिवा या भागातून नव्या रेल्वे रुळांवरून गाडी धावत असल्याने रेल्वेचा वेगही कमी होता. येत्या काही दिवसांत कळवा पुढील ठाण्याच्या दिशेकडील भागातील काम केले जाणार आहे. या कालावधीत रेल्वे प्रशासनाला मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. ठाणे दिशेकडील काम पूर्ण झाल्यास येत्या महिन्याभरात संपूर्ण पाचवी सहावी मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या फेऱ्या वाढणार आहेत.
वेळापत्रक विस्कळीत
पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी नवे रेल्वेरूळ असल्याने तसेच काही तांत्रिक कारणांमुळे कळवा ते दिवा या सुमारे ६ किलोमीटर अंतरासाठी धिम्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांचा वेग ३० किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून मध्यरेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने रेल्वेगाडय़ा धावत होत्या. त्यामुळे अनेकांना वेळेत पोहोचता आले नाही.
प्रवाशांची धावाधाव
पाचवी सहावी मार्गिका सुरू झाल्याने मुंब्रा रेल्वे स्थानकात नव्याने बनविण्यात आलेल्या दोन फलाटांवर रेल्वेगाडी थांबविली जात होती. अनेकांना याची माहिती नव्हती. त्यामुळे प्रवासी जुन्या फलाटावरच रेल्वेगाडीची वाट पाहत होते, असे चित्र होते. उद्घोषणा झाल्यावर प्रवासी जिन्यावरून किंवा काही प्रवासी रेल्वेरूळ ओलांडत नव्या फलाटांवर येत होते.