ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बस गाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे. बस चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या आसन कव्हर, उखडलेले पत्रे, असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचे होते. या बसच्या दुरावस्थेचे चित्रीकरण करत त्यात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात. परंतु या बस गाडीची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरु असल्याचा प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणला आहे. ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे ५.१५ वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते. शुक्रवारी सकाळी ही बस पाऊण तास उशिराने सोडण्यात आली. त्यामुळे स्थानकात बसची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवताच त्यांना बसची अवस्था पाहून धक्का बसला.
या शिवशाही बसच्या चालकाला समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता,फाटलेल्या सीट, उखडलेले पत्रे, असे चित्र प्रवाशांना दिसून आले. या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोनवरुन संपर्क साधत याबाबत माहिती दिली. तसेच त्याचे पुरावे म्हणून बस गाडीच्या दुरावस्थेबाबत केलेले चित्रीकरण पाठवले. यानंतर पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा- माजीवडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याच जिल्ह्यातील वंदना स्थानकातील शिवशाही बस गाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेने एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बस गाडीची दुरावस्था. चालकासमोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, फाटलेल्या आसन कव्हर, उखडलेले पत्रे, असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचे होते. या बसचे चित्रीकरण करत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.… pic.twitter.com/75Om1woDvi
— LoksattaLive (@LoksattaLive) July 4, 2025
याबाबत बोलताना राहुल पिंगळे म्हणाले की, आगारातून निघणाऱ्या बसेस सुस्थितीत आहेत का, हे बघण्याऐवजी शिवशाही’ ची ठाणे-कोल्हापूर ही दुरवस्था झालेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे. खरे तर ठाण्याहून सुटणाऱ्या या शिवशाही बसमधून परिवहन मंत्र्यांनी प्रवास केला पाहिजे. म्हणजे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा कळतील. तसेच अशा बसमुळे एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.