वादानंतरही प्रशासनाकडे झाडांच्या कत्तलीचे १८०० नवे प्रस्ताव
बिल्डरांचे मोठे गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी हजारो वृक्षांच्या कतलीस एकामागोमाग एक मंजुरी देणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाचा कारभार वादात सापडला असतानाच घोडबंदर परिसरातील तीन मोठय़ा विकास प्रकल्पांसाठी आणखी १८०० वृक्षांच्या कत्तलींचे प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
देशातील एका मोठय़ा उद्योग समूहाने बांधकाम क्षेत्रात उडी घेतली असून घोडबंदर पट्टय़ात या समूहामार्फत लवकरच टाऊनशीपचे काम हाती घेतले जाणार आहे. याशिवाय मुंबईस्थित अन्य दोघा बिल्डरांचे वृक्षतोडीचे प्रस्तावही अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्यापुढे सादर झाले असून अशा वातावरणात हे प्रस्ताव कसे मार्गी लावायचे या विचारात सध्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत हे प्रस्ताव मांडायचे, असे ठरविण्यात आले होते. मात्र, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र प्रतिकिया उमटू लागल्याने यातून काही तरी मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्नही महापालिकेतील बिल्डरप्रेमी चाणक्यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येते.
ठाणे शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबवून नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळविणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात तब्बल सात हजार वृक्षांची तोड झाल्याचा खळबळजनक आरोप मध्यंतरी शिवसेना नेत्यांनी केला होता. ठाणे शहरातील घोडबंदर पट्टय़ात बंद पडलेल्या कारखान्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यावर ‘रहिवासी वापर’ असा बदल करत मोठी नागरी संकुले उभारण्याचा सपाटाच मुंबईस्थित बडय़ा बिल्डरांनी सुरू केला आहे. ठाण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण या विकास प्रकल्पांसाठी पोषक ठरू लागल्याने गेल्या काही वर्षांत हजारो वृक्षतोडीचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर होऊ लागले आहेत. कोटय़वधी रुपयांची जमीन खरेदी करून त्यावर इमले उभे करणाऱ्या बिल्डरांना वृक्षतोडीपासून रोखायचे तरी कसे, असे कारण पुढे करत महापालिका प्रशासनानेही या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.
आणखी नवे प्रस्ताव प्रतीक्षेत
- दीड वर्षांपूर्वी मुंबईस्थित भाजप आमदार असलेल्या एका बिल्डरच्या प्रकल्पासाठी दीड हजार झाडांच्या तोडीच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकल्पात खारफुटीची मोठी कत्तल झाल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्ह्य़ातील काही आमदारांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले होते. मात्र, पुढे हा विरोध मावळल्याचे चित्र दिसून आले.
- या पाश्र्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या सभेत दोघा बडय़ा बिल्डरांसाठी १४०० वृक्षांच्या कापणीच्या प्रस्तावास घाईघाईत मंजुरी देण्यात आल्याने येथील राजकीय वर्तुळात वादंग माजला आहे.
- या मुद्दय़ावरून शिवसेनेच्या आमदारांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची कोंडी करत अप्रत्यक्षपणे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यामुळे २ सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना तूर्तास अंतिम मंजुरी द्यायची नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला.
- हे करत असताना शहरातील अन्य काही विकास प्रकल्पांसाठी आणखी १८०० वृक्षांच्या कतलीचे नवे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केल्यामुळे महापालिका वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
- या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्याची लगबग गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, नव्या वादंगामुळे तूर्तास हे प्रस्ताव फायलीत बंद करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे समजते.