कशेळी-काल्हेर भागात स्थानिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भिवंडीतील कशेळी-काल्हेर भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. गढूळ पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गढूळ पाणीपुरवठय़ामुळे येथील नागरिकांना दर आठवडय़ाला टँकरने पाणी विकत आणावे लागत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या तानसा धरण क्षेत्रातून तसेच स्टेम प्राधिकरणामार्फत भिवंडी-निजामपूर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून शहरी तसेच ग्रामीण भागात वितरण करण्यात येते. पावसामुळे मागील काही दिवसांपासून भिवंडीतील कशेळी-काल्हेर भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असून हे पाणी पिण्यासाठी तसेच इतर वापरासाठीदेखील पात्र नसते, असे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या समस्येला अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच इतर वापरासाठी टँकरने पाणी विकत आणावे लागते.
एका टँकरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यात येत असून दर आठवडय़ाला तीन ते चार टँकर विकत घ्यावे लागतात, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. नागरिकांकडून पाण्याची देयके वेळेवर वसूल करण्यात येत असूनही या भागात दरवर्षी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत काल्हेर ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही यावर काहीच उपाय करण्यात येत नाही. यामुळे या नागरिकांवर दररोज पिण्याच्या पाण्यासाठी ८० ते ९० रुपयांचा खर्च करावा लागत आहे. याबाबत मुंबई पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून याची दखल घेण्यात आली नाही, तर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन करणार आहोत, असे स्थानिक रहिवासी किशोर जाधव यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवत नसतील तर त्यांच्या पदाचा काय उपयोग, असा सवाल येथील स्थानिक नागरिक सुलक्षणा नाहाटा यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेकडून काल्हेर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यात येत असून प्रक्रिया न केलेले पाणी पुरवले जाते. तसेच राज्य सरकारकडून ग्रामपंचायतीला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र निधी मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या गृहसंकुलामध्ये पाणी शुद्धीकरणाच्या बाटल्या ग्रामपंचायतीकडून नागरिकांना दिल्या जात आहेत.
– संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, काल्हेर