Lodha Palava City Penthouses Sale: मुंबईत घर घेणे सामान्यांच्या अवाक्याबाहेर जात असतानाच आता मुंबईनजीक असलेल्या ठाण्यातील लोढा पलावा सिटीतील घरांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्याजवळ असलेल्या पलावा सिटीमध्ये ९,५०० स्क्वेअर फूटांचे दोन आलिशान पेंटहाऊस १६ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. सदर मालमत्ता खरेदीचे कागदपत्रे झॅपकीच्या हाती लागल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. या व्यवहारात प्रती स्क्वेअर फूट १६,४०० रुपयांचा दर लागू झाला असून हा या परिसरातील सर्वोच्च दर असल्याचे स्थानिक ब्रोकर्सनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले.
नोंदणी केलेल्या कागदपत्रांनुसार लोढा हँगिग गार्डनच्या ३५ व्या मजल्यावर हे दोन पेंटहाऊस आहेत. दोन पेंटहाऊससाठी १० गाडयांचे पार्किंग देण्यात आले आहे. २९ ऑगस्ट रोजी या पेंटहाऊसच्या विक्रीची नोंदणी करण्यात आली. मुद्रांक शुल्कापोटी (स्टॅम्प ड्युटी) ५४.६ लाख रुपये आणि नोंदणी शुल्क म्हणून ६०,००० रुपये भरण्यात आले आहे.
महारेराच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, पेंटहाऊस असलेली इमारत सध्या निर्माणाधीन असून मार्च २०३० पर्यंत त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जाते.
मागच्या वर्षी, लोढा पलावा प्रकल्पातील दोन फ्लॅट ७ कोटींना विकले गेले होते. त्यावेळी येथील घरांच्या किंमती प्रती स्क्वेअर फूट १४ ते १५ हजारांच्या घरात होत्या. मात्र आता विकल्या गेलेल्या पेंटहाऊसचा प्रती स्क्वेअर फूट दर १६,४०० रुपये असल्यामुळे याठिकाणच्या मालमत्तेने नवा विक्रम गाठला असल्याचे सांगितले जात आहे.
लोढा पलावा सिटीनजीक इतर ग्रेड ‘अ’ च्या विकासकांनी विकसित केलेल्या प्रकल्पांनाही सध्या प्रती स्क्वेअर फूट ९,५०० ते ११,००० रुपये एवढा दर मिळत आहे, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.
पलावा सिटी काय आहे?
पलावा सिटी ही ४,५०० एकरवर पसरलेली आहे. पुढील काही वर्षांत येथून वर्षाला ८,००० कोटी रुपयांचा महसूल गोळा होऊ शकतो, असे लोढा डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अभिषेक लोढा यांनी सांगितले होते. याठिकाणी गृह, व्यावसायिक गाळे, गोदामे, औद्योगिक जागा आणि लाइफ सायन्स हब विकसित केले जात आहेत, असेही ते म्हणाले होते.