काही महिन्यांपासून उल्हासनगर सेंट्रल रुग्णालय परिसरातील वीज प्रवाह दर शुक्रवारी खंडित करण्यात येत असल्याने रुग्णांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थ झाले आहेत.
दर शुक्रवारी रुग्णालय परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने एक्स-रे विभाग, सोनोग्राफी, ईसीजी, प्रयोगशाळा, नेत्र, शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवावे लागतात. वीजपुरवठा करताना रक्त तपासणी अहवाल तयार करणे अवघड होऊन बसले आहे. रुग्णालयात पुरेशा क्षमतेचे जनरेटर नसल्याने दोन ते तीन तासांव्यतिरिक्त वाढीव वीजपुरवठा जनरेटरमधून मिळत नाही. यातील काही जनरेटर नादुरुस्त आहेत.
उल्हासनगर परिसरातून विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी येथे रुग्ण येतात; पण दिवसभर वीजपुरवठा खंडित राहात असल्याने बसून राहणे, कंटाळून घरी निघून जाणे असे प्रकार रुग्णांना अनेक दिवसांपासून करावे लागत आहेत. अनेक रुग्ण, नातेवाईक या खंडित वीजपुरवठय़ाचा राग डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.