उल्हासनगर: अधिकचा नफा मिळण्याचे आमिष दाखवून एका ५७ वर्षीय व्यक्तीला तब्बल १ कोटी १३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अँपद्वारे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले होते. नफ्याचे पैसे बँक खात्यात परत मिळवण्याच्या प्रयत्नांनंतर अधिकचे पैसे भरण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतरही नागरिक बेजबाबदारपणे गुतवणूक करत आहेत. अवाच्या सव्वा परताव्याचे अमिष अनेकांना भुरळ घालते. त्यामुळे नागरिक कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता थेट गुंतवणूक करतात. त्यात विश्वासार्ह नसलेल्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. ज्यावेळी परतावा घेण्याची वेळ येते त्यावेळी पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब समोर येते. या प्रकारातील अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात राहणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून त्यांना तब्बल १ कोटी १३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील माहितीप्रमाणे फिर्यादी व्यक्तीला मोबाईलच्या माध्यमातून एका गुंतवणूक ऍपची लिंक पाठवण्यात आली होती. त्या लिंकच्या सहाय्याने कंपनीचे सुरुवातीचे शेअर आणि आयपीओ खरेदी करण्यात सांगण्यात आले होते. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार upstoxpro असे या गुंतवणूक ऍपचे नाव होते.

फिर्यादी यांना जास्तीचा नफा मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल १ कोटी १३ लाख ९५ हजार ३५ रूपये गुंतवले. त्यामध्ये फिर्यादी यांना झालेला नफा हा पुन्हा त्यांनी त्यांच्या खात्यात परत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो परत न करता त्यांना पुन्हा पैसे मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून वांशिक गिल आणि upstoxpro ऍप धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही असे गुंतवणूक परताव्याचे अमिष दाखवून नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी गुंतवणूक करताना सर्व बाजूनी चौकशी कारवाई आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येते. मात्र त्या नंतरही फसवणुकीचे प्रकार सुरूच असून घाईघाईने आणि अधिकच्या परतण्याच्या मोहाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे दिसून आले आहे.