उल्हासनगर : एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर दुसऱ्याच रिक्षेचा बनवत क्रमांक लावल्याने गेल्या काही दिवसात खऱ्या रिक्षाचालकाला दंड भरावा लागला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार अखेर नुकताच समोर आला. उल्हासनगरच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना एका संशयित रिक्षेची तपासणी सुरू असताना दुसरी त्याच नंबरची रिक्षा समोर येताना दिसली. चक्रवलेल्या पोलिसांनी दुसरी रिक्षा रोखून तपासणी केली. त्यामुळे एकच क्रमांकाच्या दोन रिक्षा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी बनावट क्रमांक लावलेली रिक्षा ताब्यात घेतली असून त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ३ भागातील फोलोवर लाईन परिसरात वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. तपासणी करत असताना पोलिसांना एमएच ०५ सिजी ७०८२ क्रमांकाची रिक्षा संशयास्पद वाटल्याने त्यांनी ती थांबवली. त्या रिक्षेचे कागदपत्रे तपासत असताना सारखाच क्रमांक असलेली दुसरी रिक्षा त्याच वेळी रस्त्यावरून जात होती. चक्रावलेल्या पोलिसांनी दुसरी रिक्षा रोखून तिचीही तपासणी सुरू केली. दोन्ही रिक्षा ताब्यात घेतल्या आणि दोघांचेही कागदपत्रे तपासायला घेतली. तपासणीत, डोंबिवलीत राहणारे रवींद्र पाटील यांच्या रिक्षेची कागदपत्रे खरी असल्याचे स्पष्ट झाले.
तर दुसरा चालक सुनील पाटील गेल्या ६ महिन्यांपासून खोटा क्रमांक लावून रिक्षा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे खोट्या क्रमांक वर व्यवसाय करणाऱ्या सुनील पाटील याच्यामुळे खरे रिक्षा मालक रवींद्र पाटील यांना ४ हजार ५०० रुपयांचा दंड भरावा लागला. त्यामुळे सुनील पाटील याची रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सुनील पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट क्रमांक वापरणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. वाहनधारकांनी कायदेशीर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भांबरे यांनी दिली.