उल्हासनगरः “आयो लाल… सभी चओ झूलेलाल” या गगनभेदी जयघोषाने उल्हासनगर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. चालिया व्रताच्या अखेरच्या दिवशी हजारो भाविकांनी डोक्यावर मटका उचलून मंदिर परिसरातून मिरवणूक काढत मटका विसर्जन करून या पारंपरिक सोहळ्याचा समारोप केला.
कॅम्प क्र. ५ येथील पूज्य चालिया साहिब झूलेलाल मंदिरात २१ जुलैपासून सुरू झालेला चालिया मेळा रविवारी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावात संपन्न झाला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. सकाळी ९ वाजता बहेराणा साहिब झूलेलाल साईंच्या आरतीने आणि भजन-कीर्तनांच्या गजराने संपूर्ण वातावरण पवित्र झाले. देशभरातून आलेल्या सिंधी समाजबांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन घेतले.
उल्हासनगर शहर सिंधी बांधवांची मोठी वसाहत आहे. व्यापारी शहर असलेल्या या शहराची धार्मिक शहर अशीही एक ओळख आहे. शहरात विविध दरबार, सतसंग केंद्र आहेत. येथे वर्षभर विविध सण उत्सव आणि सोहळे साजरे केले जातात. चालिया हा वर्षातील मोठा उत्सव असतो. यात सर्वच बांधव मोठ्या संख्येथेन उपस्थित राहत असतात. विशेष म्हणजे, येथील मंदिरातील ७५ वर्षांपासून अखंड प्रज्वलित असलेल्या ज्योतीच्या दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. श्रद्धेने पार पडणाऱ्या या ४० दिवसांच्या व्रताचा समारोप भक्तांच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीगीतांच्या स्वरांत केला जातो. तसाच सोहळा नुकताच पार पडला.
चालिया साहिब उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून सिंधी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि ऐक्याचा जिवंत पुरावा मानला जातो. श्रद्धेनुसार या चाळीस दिवसांच्या व्रतात भगवान झूलेलाल वरुणदेवाचा अवतार धारण करून भक्तांच्या संकटांचे निवारण करतात, असा सिंधी बांधवांचा विश्वास आहे.
या पारंपरिक सोहळ्यात शनिवार उल्हासनगर कॅम्प क्र. ५ येथील तलावावर लाखो भाविकांनी मटका विसर्जन करून व्रतपूर्ती साधली. दुसऱ्या दिवशी पल्लव साहिब सोहळ्याने या उत्सवाला शिखरावर पोहोचवले. मंदिर परिसरात चोख व्यवस्थापन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
या संपूर्ण सोहळ्यादरम्यान उल्हासनगरच्या प्रत्येक गल्लीबोळातून उमटणारा “आयो लाल, सभी चओ झूलेलाल” चा जयघोष शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाला पुन्हा एकदा अधोरेखित करून गेला. चालिया साहिब उत्सव हा फक्त सिंधी समाजाचा नव्हे, तर उल्हासनगरच्या ओळखीचा आणि एकात्मतेचा अविभाज्य भाग आहे. यात अनेक पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते.