१५ ते १८ वयोगटासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नियोजन

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे थेट शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन लसीकरण करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या वयोगटातील मुलांचे लसीकरण केंद्रांवर होणाऱ्या गर्दीतून सुटका व्हावी यासाठी अशी आखणी केली जात आहे. येत्या सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई, डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयांमध्ये मुलांसाठी लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही दोन्ही रुग्णालये दोन पाळय़ांमध्ये सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुलांचे तसेच पालकांचे समुपदेशन करून अधिक मुले लसीकरणासाठी येतील या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले. 

मुलांना घर परिसरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नियमित सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांमधील विशेष विभाग लसीकरणासाठी राखीव ठेवला जाणार आहेत. १५ ते १८ वयोगटातील बहुतांशी मुले इयत्ता १० ते १२ वर्गामधील असतात. या वयोगटातील मुलांची शाळांमधून माहिती मागविण्यात येत आहे. ही माहिती संकलित करून शाळांमधील लसीकरणासाठी पात्र विद्यार्थी संख्येप्रमाणे नियोजन करून थेट शाळेत जाऊन लसीकरण केले जाईल असे  डॉ. पाटील यांनी सांगितले.  या नियोजनामुळे लसीकरण केंद्रांवर मुलांच्या रांगा लागणार नाहीत. शिवाय विविध केंद्रांवर मुलांचे विभाजन झाल्याने गर्दी टाळणे शक्य होणार आहे. शाळांमध्ये जाऊन लसीकरण केल्याने पालकांची लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी होणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ज्येष्ठांना वर्धक मात्रा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील आरोग्य, आघाडीचे कर्मचारी, ६० वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रीकॉशन डोस) देण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. करोना प्रतिबंधित वर्धक मात्रेसाठी सहव्याधी असलेल्या ज्येष्ठांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. सरसकट ज्येष्ठांना वर्धक मात्रा दिली जाणार नाही, असे डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले. पालिकेत नोंद असलेल्या या तिन्ही गटातील लाभार्थीचे वर्धक मात्रेसाठी नियोजन केले जात आहे. येत्या १० जानेवारी पासून सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा दिली जाणार आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण, आघाडीचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. गर्दी टाळून सर्व पात्र लाभार्थीचे विहित वेळेत लसीकरण करण्यावर भर आहे. 

 डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी