नांदेड : होळी सणानिमित्त परंपरेप्रमाणे येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथे गुरुवार (दि.१३) पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.१५) या महोत्सवाचे आकर्षण असलेला होलामहल्ला अर्थात ‘हल्लाबोल’ हा कार्यक्रम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजप्यारे साहिबान यांच्या दिशादिग्दर्शनानुसार सचखंड गुरुद्वारा येथे होळी सणाचे उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. (दि.१३) मार्च रोजी प्रसिद्ध धार्मिक कवींचे काव्य वाचन तसेच रात्री किर्तन व प्रवचन होईल. शिवाय रात्री तख्त साहिबमध्ये नवीन वर्षानिमित्त विशेष किर्तन दरबार आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दशमेशज्योत इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच सिख सेवक जत्था दिल्ली स्टेट यांचा पुढाकार आहे. त्यास गुरुद्वारा बोर्डाचे सहकार्य लाभले. यामध्ये रागी भाई अनंतवीरसिंघ, भाई बलजितसिंघ हजुरी रागी दरबार साहिब यांचे किर्तन-प्रवचन होणार आहे.

१४ मार्च रोजी भाई जैमलसिंघ सहगल परिवार मुंबई व गुरुद्वारा बोर्डाच्या सहकार्याने ७५वा रैण सबाई किर्तन दरबार संपन्न होणार आहे. ज्यामध्ये भाई जगतार सिंघ व भाई देविंदर सिंघ हजूरी रागी दरबार साहिब, भाई गुरिंदरपाल सिंघ रुद्रपुरवाले यांचे किर्तन प्रवचन होईल. हा कार्यक्रम परंपरेप्रमाणे रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत होणार आहे.

शनिवारी दि.१५ रोजी होळी सणानिमित्त हल्लाबोल साजरा होईल. या धार्मिक परंपरेनुसार दु.१२ वाजता मुख्य द्वारासमोर शस्त्रपूजन होईल. त्यानंतर धार्मिक पठण, आरती, पूजन, भजन, तिलक आदी कार्यक्रम होणार आहेत.

सायंकाळी पवित्र चंडी दी वारचे पठण झाल्यानंतर परंपरेनुसार प्रार्थना होईल. त्यानंतर जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघ व पंजप्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. उपस्थित भाविकांसह भजन, किर्तन् व प्रवचन करीत गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ‘हल्लाबोल’ला सुरुवात होणार आहे.

लंगरसह आरोग्य सुविधाही

सचखंड हजुर साहिब येथे साजरा होणारा होळी सण संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातून भाविक यासाठी येत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक येणार असून त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. लंगरची सुविधा तर आहेच. शिवाय निवास व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्‍्छतेबाबत विशेष दक्षता घेण्यात येत असून २४ तास कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various religious programs organized at shri hazur sahib on the occasion of holi festival zws