ऐरोली जैवविविधता केंद्रातील जेट्टीची लांबी वाढवण्याचा निर्णय

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : सागरी पर्यटनाची आणि विशेषत: तेथील जैवविविधतेच्या अभ्यासाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी गेल्या काही वर्षांत आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्रांत पर्यटकांना यापुढे ओहोटी काळातही खाडी सफर अनुभवता येणार आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात आढळत असलेल्या जैवविविधतेचे वैविध्यपूर्ण दर्शन या केंद्रामार्फत पर्यटकांना घडविण्यात येत असते. सद्यस्थितीत या ठिकाणी जेमतेम ४० मीटर लांबीची जेट्टी उपलब्ध असल्याने ओहोटी काळात खाडी सफर बंद ठेवावी लागते. राज्याच्या खारफुटी संवर्धन विभागाने ही जेट्टी २०० मीटरपर्यत लांब खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव पर्यावरण विभागापुढे मांडला असून त्यास मंजुरी मिळाल्यास पर्यटकांच्या खाडी सफरीत बाधा येणार नाही.

राज्याच्या किनारी आणि सागरी वैविध्याविषयीची माहिती यांत्रिक उपकरणांद्वारे तसेच दृश्य, श्राव्य आणि स्पर्शिक घटकांच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी ऐरोली सेक्टर १० येथे खाडीकिनारी हे केंद्र सुरू करण्यात आले. किनारी जैवविविधतेच्या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिकेबद्दल आणि जैवविविधतेला असलेल्या धोक्याबद्दलची माहिती पर्यटकांना मिळावी हादेखील हे केंद्र सुरू करण्यामागील महत्त्वाचा उद्देश होता. ऐरोली खाडीकिनारी पाच एकर जमीन आणि ३५ एकर खारफुटी किनारी उभारण्यात आलेल्या या केंद्रात होणारी खाडी रपेट पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. या केंद्रातून खाडीपर्यंत जाण्यासाठी बोर्डवॉक आणि जेट्टी असे दोन मार्ग ठरविण्यात आले आहेत. बोर्डवॉक संपूर्ण बांबूपासून बनवलेला असून कांदळवनातून वाट काढत पर्यटकांना खाडीचे दर्शन घडवितो, तर जेट्टीवरून खाडीतील जैवविविधता पाहाण्यासाठी नोव्हेंबर २०१९ पासून बोट सफारीची व्यवस्थाही कांदळवन संवर्धन विभागाने केली आहे.

ओहोटीचा अडथळा

गेल्या काही वर्षांपासून या केंद्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असून करोना काळात निर्बंध शिथील होताच पर्यटकांचा ओघ कायम आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी उभारण्यात आलेली जेट्टी जेमतेम ४० मीटर लांबीची आहे. त्यामुळे ओहोटीच्या काळात येथून बोटसफर घडविणे जवळपास अशक्य असते. सुटीच्या काळात याठिकाणी बोट सफरीसाठी तसेच फ्लेमिंगो छायाचित्रणासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आकडा बराच मोठा आहे. बोर्डवॉकवरून तसेच जेट्टीवरून कांदळवनातून वाट काढणारा मार्गही ठरावीक अंतरावर संपत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असतो. हे लक्षात कांदळवन संवर्धन विभागाने जेट्टीची लांबी २०० मीटपर्यंत आत वाढविण्याचा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागापुढे मांडला आहे. ही जेट्टी दोन मीटर रुंद असणार आहे. जेणेकरून अधिकाधिक पर्यटकांना खाडीतील जैवविविधता अनुभवता येईल, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. जेट्टीच्या विस्तारीकरण कामामुळे खारफुटीला कोणताही धोका पोहचणार नाही, असा दावाही सूत्रांनी केला. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच पुढील काम सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.