कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय नेहमीच रुग्ण सेवा, तेथील वैद्यकीय उपचारातील त्रृटीमुळे चर्चेत राहिले आहे. आता याच रुग्णालयातील एक वाॅर्डबाॅय रुग्णालयात रुग्ण महिलांचे रक्तदाब तपासत असताना महिलांशी गैरवर्तन करत होता. या वाॅर्डबाॅयच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून आरोग्य विभागाने या वाॅर्डबाॅयची डोंबिवलीतील गरीबाचापाडा येथील पालिका औषध साठा पुरवठा केंद्रात शिक्षा म्हणून बदली केली आहे.

प्रवीण भोजने असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते करोना महासाथीच्या काळात पालिकेत कामाला लागले आहेत. ते कंत्राटी पध्दतीने पालिका सेवेत कार्यरत आहेत. करोना महासाथ काळात पालिका सेवेत लागलेले काही कर्मचारी मनमानी, उर्मटपणे वागत असल्याच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. याच गटातील भोजने हे कर्मचारी असल्याचे समजते. प्रवीण भोजने हे कर्मचारी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणून कार्यरत होते.

रुग्णालयातील परिचारिकांकडून रुग्णांचा रक्तदाब तपासला जातो. काही वेळा परिचारिका इतर कामात व्यस्त असतील तर ते काम वाॅर्डबाॅय भोजने करत होते. मागील पाच वर्षापासुनचा रुग्ण सेवेचा अनुभव असल्याने भोजने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रत्येक कक्षात जाऊन रुग्णांचे रक्तदाब नोंदी घेण्याचे काम करत होते. दिवसा, रात्रपाळीत ते ही कामे करत होते. रुग्णालय सेवेतील भोजने हे कर्मचारी असल्याने त्यांच्या कामावर रुग्णालय प्रशासनाचा विश्वास होता.

परंतु, शास्त्रीनगर रुग्णालयात रक्तदाब तपासून नोंदी घेणारा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल महिलांची रक्तदाब तपासणी आणि नोंदी करताना महिलांशी गैरवर्तन करत होता. अशाप्रकारच्या बहुतांशी महिला रुग्ण, नातेवाईकांकडून परिचारिका, डाॅक्टरांकडे तक्रारी करण्यात आल्या. हा कर्मचारी प्रवीण भोजने असल्याचे निष्पन्न झाले. या वाढत्या तक्रारींमुळे भोजने यांच्याकडील रक्तदाब तपासणी आणि नोंदीचे काम शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाने काढून घेतले होते. महिला रुग्णांशी या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या गैरवर्तनबाबतचा अहवाल शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चोधरी यांनी उपायुक्त प्रसाद बोरकर, आरोग्य मुख्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना पाठविला होता.

वाॅर्डबाॅय भोजने यांच्याबाबत महिलांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यावेळी भोजने रक्तदाब तपासणी करताना महिला रुग्णांशी गैरवर्तन करत होते, हे स्पष्ट झाले. आरोग्य मुख्यालयाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाने या वाॅर्डबाॅयवर योग्य कारवाई करण्याची मागणी आरोग्य मुख्यालयाकडे केली होती.

या मागणीप्रमाणे या वाॅर्डबाॅयला महिला कर्मचाऱ्यांचा वावर नसलेल्या डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा येथील पालिकेच्या औषध साठा आणि पुरवठा केंद्रात शिक्षा म्हणून तडकाफडकी बदली केले आहे. या कर्मचाऱ्याच्या विरुध्द अनेक महिला रुग्णांच्या तक्रारी होत्या. शास्त्रीनगर रुग्णालयातील एका सल्लागार ज्येष्ठ डाॅक्टरने हा प्रकार पालिका वरिष्ठांनाही सांगितला आहे. या वाॅर्डबाॅयला निलंबित करण्याची मागणी महिला रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याबाबत महिला रुग्ण, नातेवाईकांच्या अनेक तक्रारी होत्या. या कर्मचाऱ्याची वरिष्ठांच्या आदेशावरून तडकाफडकी कर्मचारी वावर नसलेल्या विभागात बदली करण्यात आली आहे. – डाॅ. योगेश चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली.