अंबरनाथ : अंबरनाथच्या विमको नाक्याजवळ सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे कल्याण बदलापूर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. यावेळी लाखो लीटर पाणी वाया गेले. १० ते १५ फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे वाहनचालक रस्त्याच्या एका कडेने वाहने नेत होते. परिणामी कल्याण बदलापूर राज्यमार्गावर या भागात कोंडी झाली होती.

अंबरनाथ शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. बदलापूर येथील बॅरेज बंधाऱ्यावरून पाणी उचलले जाते. ते बदलापूर आणि अंबरनाथ शहराला दिले जाते. यासह अंबरनाथ शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चिखलोली धरणातूनही पाणी पुरवठा केला जातो. या तीन यंत्रणांच्या माध्यमातून मिळणारे पाणी व्यवस्थापन करून शहरवासियांना दिले जाते.

यातील एकाही जलस्त्रोत किंवा वितरण व्यवस्थेत अडचण निर्माण झाल्यास त्याचा फटका नागरिकांना बसतो. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत अंबरनाथच्या विविध भागात पाणी व्यवस्थापनाच्या नावाखाली पाणी कपात करण्यात आली होती. सध्या कपात नसली तरी वीज वितरणातील दोषामुळे नागरिकांना पाणी कपातीचा फटका बसतो.

गुरूवारी अशाच प्रकारे कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विमको नाक्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाशेजारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी अंबरनाथच्या पश्चिमेत पाणी पुरवठा करते. जलवाहिनी फुटल्याने १० ते १५ फुटांपर्यंत पाण्याचा उंच कारंजे निर्माण झाले. त्याचा फटका कल्याण बदलापूर राज्य मार्गावरील वाहतुकीला बसला.

येथून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना त्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. तर रस्त्यावरही पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक चिंचोळ्या भागातून सुरू होती. त्यामुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाहिनीची पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तर जलवाहिनी दुरूस्तीचे कामही हाती घेण्यात आले होते.