नालेसफाई चांगली झाल्याने शहरात पावसाचे पाणी तुंबणार नाही असा दावा प्रशासन दर वर्षी करत असले तरी पावसाळ्यादरम्यान शहर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याच्या घटना संपूर्ण मोसमात दोन-तीन वेळा तरी घडतच असतात. अनेक भागांत दोन ते तीन फूट पाणी साचून नागरिकांचे दर वर्षी मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असते. या वर्षीदेखील पहिल्याच पावसात शहरातील अनेक भाग जलमय झाले आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा-भाईंदर शहर हे तीन बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढले गेले आहे आणि एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर येतो. त्यातच शहर हे समुद्रसपाटीपासून काही प्रमाणात खाली आहे. परिणामी समुद्राला भरती असली की शहरातील पावसाचे पाणी खाडीत न जाता उलट शहरात परत येते, त्यामुळे मोठय़ा पावसात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात. परंतु पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पावसाळ्यात शहर जलमय होण्यासारखी परिस्थितीतच उद्भवत नसे. त्या वेळीदेखील समुद्राला भरती येत असे आणि भरतीच्या वेळेत मोठा पाऊस पडत असे. परंतु पावसाचे पाणी अनेक नैसर्गिक नाल्यांद्वारे वाहून जात असे. शिवाय पाणी पसरण्यासाठी मोकळ्या जागा भरपूर असल्याने पाणी तुंबून राहत नसे. परंतु या ठिकाणी योग्य नियोजनाअभावी झालेले झपाटय़ाने शहरीकरण हे या समस्येचे मूळ आहे.

मूळ गावाचा परिसर सोडला तर शहराच्या सर्व भागात एक तर शेती केली जात होती किंवा मीठ पिकवले जात होते; परंतु मुंबई शहराला अगदी लागून असलेल्या इथल्या मोकळ्या जागांवर विकासकांची नजर पडली आणि इथल्या जमिनींना सोन्याचे मोल आले. शेती आणि मीठ उत्पादन संपुष्टात येऊन या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले. इथली जमीन मूळची खाजणाची असल्याने विकासकाने इमारती बांधण्यासाठी मनमानी पद्धतीने मातीभराव केले. या भरावासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले गेले नाही. लगतच्याच जमिनींमध्ये करण्यात आलेल्या मातीभरावाच्या पातळीत लक्षणीय फरक असल्याने अनेक जुन्या इमारतींचे परिसर नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतींपेक्षा खाली गेले. त्यातच अनेक जमिनींमध्ये पाण्याचे नैसर्गिक प्रवाह होते. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी हे प्रवाह शाबूत ठेवणे आवश्यक होते; परंतु भविष्याचा विचार न करता बेधडकपणे नैसर्गिक नाल्यात मातीभराव करून ते बुजवण्यात आले. महापालिका प्रशासनानेदेखील या अवैध मातीभरावाकडे कानाडोळा करण्यातच धन्यता मानल्याने पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग कायमचे बंद झाले.

शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा नाल्यांची संख्या सव्वाशेच्या आसपास आहे आणि हे पाणी मुख्य खाडीकडे वाहून नेणाऱ्या मोठय़ा नाल्यांची संख्या १२ च्या आसपास आहे. या नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात तिवरांची झाडे वाढली असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत असल्याचा मुद्दा प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येत असतो. तिवरांची नाल्यातील जंगले दाट वाढली असल्याने या झाडांमधून कचरा आणि गाळ साचून नाल्याचा मार्गच अनेक ठिकाणी बंद झाला आहे. ही तिवरे शहरात पाणी तुंबण्यास कारणीभूत असल्याचा मुद्दा प्रशासनाने उपस्थित केला आहे. परंतु याला प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. या सर्व नाल्यांच्या पात्रात बेकायदा भराव करण्यात आले आहेत. शिवाय त्याच्या काठावर झोपडपट्टय़ाही वसल्या आहेत. या बेकायदा भरावाला आणि वाढत्या झोपडय़ांना महापालिका अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच पायबंद घातला असता तर नाल्यांची पात्रे अरुंद झाली नसती आणि किनाऱ्यावरील वाढत्या झोपडपट्टय़ांमुळे नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यालाही अटकाव झाला असता. शहराच्या झालेल्या या अवस्थेमुळे पावसाने जोर धरू लागला की नागरिकांच्या मनात धडकी भरू लागते. रात्री-अपरात्री पाणी घरात शिरण्याची भीती नागरिकांना भेडसावत राहते. प्रशासनाकडून झालेल्या काही चुका आता निस्तरणे अशक्य असले तरी नाल्यांच्या किनाऱ्यावरची अतिक्रमणे दूर करणे, नालेसफाई प्रामाणिकपणे करणे, बेकायदा मातीभरावावर नियंत्रण आणणे, रस्ते आणि गटारांची पातळी एकसमान राखणे आदी उपाययोजना या समस्येवर मलमपट्टी ठरू शकेल, मात्र त्याची गांभीर्याने अंमलबजावणी करणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterlogging in mira bhayandar due to lack of planning
First published on: 04-07-2017 at 00:45 IST