चुकीच्या माहितीमुळे कोपरीत घबराट
सोशल मीडियावर व्हॉटस्अॅप हे प्रभावी माध्यम ठरू लागले आहे. मात्र या माध्यमातून अनेकदा चुकीचे संदेश पाठवून अफवा पसरविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस्अॅपवर ‘कोपरी पूल कोसळला’ अशा स्वरूपाचा संदेश फिरू लागला असून त्याच्यासोबत पुलाचे छायाचित्र पाठविण्यात येत आहेत. प्रत्यक्षात कोपरी पूल सुस्थितीत असल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे पूर्वेतून पश्चिम भागात येण्याकरिता कोपरीकरांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा मानला जात असल्याने या अफवेमुळे कोपरी परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण होते.
ठाणे पूर्व अर्थात कोपरी भागात मोठी लोकवस्ती असून हा परिसर ठाणे शहराच्या एका बाजूला आहे. त्यामुळे या भागातून ठाणे शहर, मुंबई तसेच आसपासच्या शहरात वाहनाने जायचे असेल तर नागरिकांना कोपरी रेल्वे पूल ओलांडून पश्चिम भागात यावे लागते. ठाणे पूर्वेतून पश्चिम भागाकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यामध्ये सिडको आणि कोपरी रेल्वे पुलाचा समावेश आहे.
तसेच या भागातील एक मार्ग आनंदनगर चेक नाक्याजवळही निघतो. मात्र सिडको आणि आनंदनगर या दोन्ही मार्गापैकी कोपरी रेल्वे पुलाचा मार्ग वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने अनेकजण त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर खासगी बस वाहतूक सुरू असते. याशिवाय, घोडबंदर भागातील गृहसंकुलांच्या तसेच कंपनीच्या बसगाडय़ांचाही या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. ठाणे परिवहन सेवा तसेच बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ाही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिीकोनातून कोपरी रेल्वे पूल महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस्अॅपवर ‘कोपरी पूल कोसळला’ अशा स्वरूपाचा संदेश पसरविला जात आहे. त्यासोबत पूल पडल्याचे छायाचित्र पाठविण्यात येत आहे. या संदेशाची कोणतीही खातरजमा न करताच अनेकजण हा संदेश एकमेकांना तसेच विविध ग्रुपवर पाठवीत आहेत. त्यामुळे एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये हा संदेश काही तासांतच अनेकांपर्यंत पोहोचल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तसेच या संदेशामुळे कोपरी परिसरात घबराट पसरली आणि सर्वच पूल पडल्याची चर्चा रंगली.
मात्र कोपरी भागातील काही जणांनी खरोखरच हा पूल पडला का, याची घटनास्थळी जाऊन खातरजमा केली. त्या वेळी कोपरी पूल सुस्थितीत असल्याने ही अफवा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही अफवा असल्याचा संदेश टाकला.
मात्र तरीही काही व्हॉटस्अॅपवरील पडीक लोकांकडून हा संदेश पाठविण्याचे प्रकार सुरूच होते. या प्रकारामुळे सोशल मीडिया जितकी फायदेशीर, तितकीच घातकही ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.