डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील रिजन्सी इस्टेट भागातील ई प्रभाग कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कामगार बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयीन वेळेत एका निवाऱ्यात जुगार खेळत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित राष्ट्रीय बजरंग दलाचे ठाणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मनोज कुमार गिरी यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. या चित्रफितीच्या आधारे साहाय्यक आयुक्तांनी या कामगारांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

बुधवारी दुपारी कार्यालयीन वेळेत ई प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कामगार दुपारच्या वेळेतील भोजन झाल्यानंतर भोजन निवाऱ्यात जुगार खेळत होते. यामध्ये ई प्रभागातून बदली होऊनही या प्रभागात ठाण मांडून असलेले प्रकाश म्हात्रे, तसेच विश्वास भाने, दीपक भालेराव, माने असे आठ ते नऊ कामगार पैसे लावून जुगार खेळत होते. मानपाडा पोलिसांनीही याप्रकरणाची दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कामगार जुगार खेळत असल्याची कुणकुण लागल्यावर बजरंग दल कार्यकर्ते मनोज गिरी यांनी घटनास्थळी जाऊन तेथील दृश्यध्वनी चित्रफित तयार केली. जुगार खेळण्याच्या मंचावर पैसे, पत्त्यांची पाने होती. हे कामगार नेहमीच दुपारच्या वेळेत कार्यालयीन वेळ सुरू असुनही जुगार खेळत असल्याच्या तक्रारी होत्या. वरिष्ठांनी कामगारांच्या बेशिस्तपणाची गंभीर दखल घेतली आहे. या कामगारांना पालिकेच्या वरिष्ठांची भीती आहे की नाही. प्रशासनावर वरिष्ठांचा वचक राहिला आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

ही दृश्य चित्रफिती ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांना पाहण्यास मिळताच त्यांनी जुगार खेळणाऱ्या आठ ते नऊ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. काही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन हजेरी लावून आपली घरगुती कामे करणे, बाजारात फेरी मारून दुकानदार, फेरीवाल्यांच्या भेटीगाठी घेणे असे प्रकार करत असल्याच्या वाढत्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

ई प्रभाग हद्दीतील डोंबिवली एमआयडीसी कावेरी चौक, पेंढरकर महाविद्यालय परिसरातील रस्ते, २७ गाव, सागाव, नांदिवली, देसलेपाडा, स्वामी समर्थ मठ परिसर, भोपर, शिळफाटा रस्त्यालगत फेरीवाले, भेळपुरी विक्रेते रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर हे पथक कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आहेत.

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात फेरीवाला हटाव पथकातील कामगार रेल्वे स्थानक भागात सकाळ, संध्याकाळ चहाच्या ठेल्यावर ठिय्या मारून बसलेले असतात. प्रभागातील फेरीवाल्यांवर ते कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी आहेत. या प्रभागात पथक प्रमुख विजय भोईर वीस वर्षापासून एकाच प्रभागात कार्यरत आहेत.

ई प्रभाग कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन वेळेत गैरप्रकार करत असल्याची चित्रफिती पाहून संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. – तुषार सोनवणे, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग.