संरक्षित वनक्षेत्राऐवजी येऊरमधील अन्य जागेवर उभारणी; आदिवासी संस्कृती, वन्यजीवनाचे दर्शन घडवणार
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून कागदावरच असलेले येऊरमधील आदिवासी पर्यटन केंद्र अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे केंद्र ज्या जागेवर प्रस्तावित करण्यात आले होते, ती जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याचा अभिप्राय राज्य सरकारने दिला होता. त्यामुळे महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला होता. अखेर या प्रकल्पासाठी संरक्षित नसलेली येऊरमधील एक जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असून त्यासाठी पैसे भरण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे.
ठाण्यातील शांत आणि निसर्गरम्य परिसर म्हणून येऊर परिसर ओळखला जातो. महापालिकेने वन विभागाच्या सहकार्याने याठिकाणी आदिवासी पर्यटन केंद्र विकसित करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. या केंद्राच्या उभारणीसाठी चार कोटी ८६ लाख २० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. देशविदेशीच्या पर्यटकांना जंगलाची आणि आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी या उद्देशातून हे केंद्र विकसित केले जाणार आहे. मात्र महापालिकेने प्रस्तावित केलेली जागा संरक्षित वनक्षेत्र असल्याचे वनविभागाच्या प्रधान सचिवांच्या पाहणीत आढळले होते. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला होता. मात्र, वन विभागाने आता या प्रकल्पासाठी येऊरमधील संरक्षित नसलेली जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २० लाख रुपये भरण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मांडला आहे.
पर्यटन केंद्र असे..
येऊरमध्ये आदिवासी पर्यटन केंद्रासाठी यापूर्वी ८ हजार ९६२ चौरस मीटर इतकी जागा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ही जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असून या जागेऐवजी आता दुसरी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. याठिकाणी प्रवेश आणि स्वागत कक्ष, प्रशासकीय क्षेत्र व प्रदर्शन केंद्र, सभागृह, प्रदर्शन केंद्र व निवास व्यवस्था निर्माण केले जाणार आहे. तसेच परिसरात माहितीफलक, मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, जंगलातील विविध शोभेच्या वस्तू, आसन व्यवस्था, नाल्यावरील लाकडी पूल इत्यादींचाही समावेश असणार आहे.
आदिवासी पर्यटन केंद्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा संरक्षित क्षेत्रात येत असल्याची बाब राज्याच्या प्रधान सचिवांनी केलेल्या दौऱ्यादरम्यान समोर आली होती. त्यामुळे या जागेऐवजी आता दुसरी जागा वन विभागाने दिली असून या जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे. – रवींद्र खडताळे, नगर अभियंता, ठाणे महापालिका