21 Year Boy Cancer Viral Story: रेडिटवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सध्या हळहळ व्यक्त होत आहे. २१ वर्षीय तरूणाने त्याच्या कर्करोगाच्या लढ्याबद्दल एक हृदयद्रावक कहाणी सांगितली. अनेकदा केमोथेरपी झाल्यानंतर आता डॉक्टरांनीही हात टेकले असून यापुढे काहीही होऊ शकणार नाही, असे ते म्हणाल्याचे तरूणाने सांगितले. या पोस्टनंतर हजारो लोक प्रार्थना करत आहेत. २१ वर्षीय तरूणाला २०२३ मध्ये स्टेज ४ कोलोरेक्टल कर्करोगाचे निदन झाले.
या तरूणाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “कर्करोग जिंकला मित्रांनो, निरोप घेतो. मी २१ वर्षांचा मुलगा आहे. मला स्टेज ४ चा कोलोरेक्टल कर्करोग असल्याचे २०२३ साली निदान झाले. केमोथेरपीचे अनेक सत्र, बराच काळ रुग्णालयात काढल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, आता काहीच उपचार बाकी नाहीत. यावर्षीच्या अखेरीस आणखी उपचार ते करू शकणार नाहीत.
मी शांतपणे जागाचा निरोप घेतोय
या तरुणाने पुढे लिहिले की, दिवाळीचा सण येतोय. रस्त्यांवर दिव्यांची सजावट दिसू लागली आहे. मी ही रोषणाई शेवटची पाहतोय, हे पचवणं थोडं जड जातंय. दिव्यांची उजळण, तो आवाज आणि मित्रांबरोबरचं ते दिलखुलास हास्य मला आठवत राहिल. इतरांचं आयुष्य पुढं सरकत असताना मी मात्र शांतपणे जगाचा निरोप घेतोय. मला माहितीये पुढच्या वर्षी माझ्या आठवणीत कुणीतरी दुसरंच दिवा लावणार आहे. मी फक्त आठवणीत उरेल.
“मला खूप काही करायचे आहे. भटकंती करायची आहे, माझे स्वतःचे काहीतरी सुरू करायचे आहे, सर्व काही सुरळीत झालं तर कदाचित एक श्वान पाळण्यासाठी घेईन म्हणतो. पण नंतर मला आठवतं की, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि मग मनात आलेले विचार मी पुसून टाकतो. मी आता घरी असतो आणि माझ्या पालकांच्या चेहऱ्यावरचे दुःख मला दिसते”, अशी खंत या तरूणाने व्यक्त केली.
म्हणून मी ही पोस्ट शेअर करतोय
सदर पोस्ट शेअर करण्यामागची भूमिका विशद करताना तरूणाने म्हटले की, मला खरंच माहीत नाही, हे पोस्ट मी का शेअर करतोय. कदाचित मला याची नोंद करून ठेवायची आहे. कारण जेव्हा केव्हा मी शांतपणे हे जग सोडेन तेव्हा ही पोस्ट आठवण म्हणून राहिल.
युजर्सनी केली देवाकडे प्रार्थना
या पोस्टनंतर अनेकांनी या तरूणाप्रती सहानुभूती व्यक्त केली. काहींनी म्हटले की, चमत्कार होऊन तुझ्या आयुष्यात बदल व्हावा. एकाने कमेंट करत म्हटले की, प्रिय देवा, जर चमत्कार होत असतील तर कृपया या मुलाच्या आयुष्यात तो चमत्कार घडव. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, मित्रा, तुझ्या आयुष्यात तू काय भोगतो आहेस, याची मला कल्पना आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करू शकतो.