नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या मजेदार पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. याआधीही त्यांनी पाणीपुरी खातानाचा एक फोटो आणि मुंबईचा वडापाव बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी आज पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. प्रवासादरम्यान इंडिगो विमानातील एक मजेशीर गोष्ट त्यांनी फोटो काढून शेअर केली आहे आणि सोशल मीडियावर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ही व्हायरल पोस्ट विमानातील आहे. नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग इंडिगो कंपनीच्या विमानातून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांचं खास स्वागत करण्यात आलं. त्यांना एक निळ्या रंगाची बॅग, काही खाण्याचे सामान, तसेच त्यांच्यासाठी एक मजेशीर चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. इंडिगो विमान कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यानं अलॉन्ग यांची प्रशंसा करीत एक मजेशीर गोष्ट चिठ्ठीमध्ये लिहिली. या महिला कर्मचाऱ्यानं चिठ्ठीत नक्की काय लिहिलं एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमध्ये बघा.
हेही वाचा…Video: कर्मचाऱ्याने ॲपल कंपनीत १० वर्ष केलं काम! टिम कूकने दिली अनोखी भेटवस्तू…
पोस्ट नक्की बघा :
नागालँडचे मंत्री अलॉन्ग यांनी या चिट्ठीचा फोटो काढून शेअर केला आहे; ज्यात लिहिलं आहे की, प्रिय सर… तुम्हाला फ्लाइटमध्ये पाहून खूप आनंद झाला. तुम्ही नेहमीसारखेच खूप क्यूट (Cute) दिसताय. मी तुम्हाला माझा फोन नंबर द्यायला हवा होता; पण आपल्या दोघांचं आडनाव एकच असल्यामुळे आपण एकमेकांचे भाऊ-बहीण झालो आहोत. इंडिगो विमानातून प्रवास केल्याबद्दल धन्यवाद! आणि खाली नागालँडचे मंत्री अलॉन्ग यांचं नाव लिहिलं होतं, अशी खास आणि मजेशीर चिठ्ठी इंडिगो विमानात काम करणाऱ्या त्या महिला कर्मचाऱ्यानं लिहून ठेवली होती.
नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @AlongImma या अकाउंटवरून टाकली आहे.
आणि “सोप्या भाषेत…मला फोन नंबर नाही दिला”; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी या मजेशीर घटनेवर नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांना गाणं गाऊन चिडवताना, तर रक्षाबंधनला नक्की राखी घेऊन जा, असे कमेंटमध्ये आवर्जून सांगताना दिसत आहेत. तसेच ‘एक्स (ट्विटरचा) सगळ्यात मनोरंजन राजकारणी’ असे काही जण नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांना म्हणताना दिसत आहेत.