Ayodhya Hospital Water Logging Video: अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या रामपथावर अनेक ठिकाणी रस्ता खचला असून पाणी साचल्याचे व्हिडीओज समोर आले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जल निगमच्या सहा अधिकाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. इंडियन एक्सस्प्रेसच्या वृत्तानुसार,अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकापूर्वी बांधण्यात आलेल्या रामपथावर १० हुन अधिक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रामपथच नाही तर नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडून पाणी साचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याआधी शहरात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांधकाम करण्यात आले होते. या सगळ्या बांधकामांसाठी हा पहिलाच पावसाळा आहे. दुर्दैवाने अनेक बांधकामांना पावसाचा फटका बसल्याचे दिसतेय. आज, शनिवारी २९ जूनला सकाळी पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तर अयोध्येतील श्री राम रुग्णालयाच्या आवारात सुद्धा पावसाचे पाणी साचल्याचे दिसतेय. या साचलेल्या पाण्यातून लोक सुद्धा चालताना दिसत आहेत.

दुसरीकडे, अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती ज्या गाभाऱ्यात ठेवली आहे तिथे सुद्धा पहिल्या पावसात गळती सुरु झाली आहे. फक्त राम मंदिराच्या गाभाऱ्यातच नाही तर अन्य ठिकाणी देखील गळती होत आहे. या गळतीची चौकशी होणं अपेक्षित आहे. बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणं आवश्यक आहे. यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पूजा करणे कठीण होईल, असं महंत सत्येंद्र दास यांनी म्हटलं होतं.

तर राम मंदिरातील गळतीच्याबाबत मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी उत्तर देत म्हटले की, “मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिली आहे. दुसऱ्या मजल्यावर बांधकाम चालू असल्याचे ही गळती होत आहे कारण मुळात संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी साठलं आणि मंदिराच्या छतामधून गळती होत आहे. लवकरच छत पूर्ण झाकले जाईल व हा प्रश्न सुटेल. आता राहिला प्रश्न मंदिराच्या गाभाऱ्यातून पाणी काढण्याचा तर त्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही, पाणी हातानेच काढावं लागतं. मंदिरात तसा उतार असल्याने ही पाणी भरण्याची समस्या येत नाही पण गाभाऱ्यात सध्या ही अडचण आहे. पण विश्वास ठेवा मंदिर निर्मितीमध्ये कमतरता नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ayodhya ram mandir water leakage shri ram hospital water logging made people suffer watch video rain updates today svs