Apple iPhone 17 series sale open today: मुंबईतील बीकेसमधील अॅपल स्टोअरचा परिसर आज चांगलाच गजबजलेला आहे. कारण आजपासून अॅपलच्या आयफोन १७ सिरीजच्या फोनची विक्री सुरू झाली आहे. चार किंवा पाच नाही तब्बल १० तासांपासून लोक इथे रांगेत उभे आहेत. गुरूवारी रात्रीपासूनच ग्राहकांनी या स्टोअरच्या बाहेर रांग लावायला सुरूवात केली. शेकडो ग्राहक रात्रभर रांगेत उभे राहून नवीन आयफोन १७ खरेदी करणारे पहिले ग्राहक ठरले आहेत.
गुरूवारी संध्याकाळपासूनच ग्राहकांनी बीकेसीतील अॅपल स्टोअरची वाट धरली. अनेकांनी आजचा दिवस चुकू नये यासाठी रात्र घराबाहेर काढत आयफोन १७ची प्रतीक्षा केली. इथे आलेल्या एका ग्राहकाने म्हटले की, मी नारंगी रंगाचा आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी आलो आहे. मी रात्री ८ वाजल्यापासून वाट पाहत आहे. जास्त क्षमतेची बॅटरी आणि नवीन डिझाइन हे आयफोन १७चे प्रमुख आकर्षण आहे.
आणखी एका ग्राहकाने सांगितले की, अनेक महिन्यांपासून प्रो मॅक्सची वाट पाहत होतो. मी आयफोन १७ प्रो मॅक्स साठी खूप उत्सुक आहे. यावेळी अॅपलमध्ये एक नवीन डिझाइन आहे. त्यात ए१९ बायोनिक चीप आहे, त्यामुळे गेमिंगचा अनुभव चांगला असेल.
आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असतानाच दुसरीकडे गर्दीमुळे रांगेत उभे असलेल्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिस्थिती चिघळण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच आयफोन १७ सिरीज लाँच करण्यात आली आहे. या मालिकेत आयफन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि प्रिमियम आयफोन एअर यांचा समावेश आहे. यावर्षी अॅपलने नवीन लूक, प्रगत कॅमेरा, सुधारित बॅटरी लाइफ अशी अनेक वैशिष्ट्ये या नवीन सिरीजमध्ये दिली आहेत. भारतात आयफोन १७ सिरीजची विक्रमी विक्री होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबईतील बीकेसी स्टोअरमध्ये सर्वाधिक गर्दी झाली आहे. शिवाय दिल्ली, पुणे आणि बंगळुरूमध्येही असाच उत्साह आहे.
भारतात आयफोन १७ सिरीजची किंमत
- iPhone 17 – ८२,९०० रूपये
- iPhone Air – ११९,९०० रूपये
- iPhone 17 Pro – १३४,९०० रूपये
- iPhone 17 Pro Max – १४९,९०० रूपये