आजपर्यंत तुम्ही रुळावरुन धावणाऱ्या ट्रेन पाहिल्या असतील, पण आजवर तुम्ही कधी अशी ट्रेन पाहिली आहे का, जी रुळांवरुन नाही तर रुळांच्या खालून धावते. म्हणजे रुळांच्या खाली लटकून ही ट्रेन धावताना दिसते. जाणून आश्चर्य वाटलं ना, पण जगात असे काही देश आहेत जिथे ट्रेन रुळांच्या खालून धावतात. तुम्ही आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये वैगरे अशा ट्रेन पाहिल्या असतील, पण जर्मनीत अशाप्रकारे ट्रेन रुळांच्या खालून धावताना दिसतात, या ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात, तेही बिनधास्तपणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुळांच्या खालून धावते ट्रेन

या ट्रेनला लोक ‘हँगिंग ट्रेन’ असे म्हणतात. जमिनीपासून सुमारे ४० फूट उंचवर असलेल्या रुळाच्या खालून या ट्रेन धावतात. अनेकांना हा नव्या टेक्नॉलॉजीतील चमत्कार वैगरे वाटला असेल पण तसे नाही, कारण हे रेल्वे रुळ २१ व्या शतकापूर्वी तयार करण्यात आले होते. जर्मनीतील वुपरटल शहरातून अशाप्रकारच्या ट्रेन धावतात. ज्या वुपरटल सस्पेंशन रेल्वे अंतर्गत चालवल्या जातात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, या रेल्वे रुळांची रचना अशाप्रकारे का करण्यात आली. तर यामागचे कारण असे की, वुपरटल शहर इतके व्यस्त आहे की इथल्या रस्त्यांवर चालण्यासही जागा नाही. यात हे शहर डोंगराळ भागात असल्याने तिथे अंडरग्राउंड ट्रेनही धावू शकत नाहीत. ट्रॅक टाकण्यासाठी शहरात जागाच उरली नसल्याने इंजिनिअर्सनी आपल्या बुद्धीचा वापर करून अशाप्रकारचे रेल्वे रुळ तयार केले ज्यावरुन ट्रेन उलट्या धावू लागल्या. ही ट्रेन दररोज १३.३ किमी प्रवास करते. या मार्गावर २० रेल्वे स्थानकं आहेत. ज्यावर १२३ वर्षांपासून अखंडपणे ट्रेन धावत आहेत. या ट्रेनचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

जर्मनीशिवाय ‘या’ देशात धावतात अशा ट्रेन

या ट्रेनची गणना जगातील सर्वात जुन्या मोनोरेल्समध्ये केली जाते. ही ट्रेन सुमारे १९,२०० टन स्टीलपासून बनवली आहे. या ट्रेनमध्ये बसून प्रवास करण्याचा अनुभव खूपच रोमांचक आहे. ही ट्रेन हवेत उलटी लटकत धावत असली तरी प्रवाशांच्या सीट्स सामान्य रेल्वे गाड्यांप्रमाणेच सरळ आहेत. जर्मनी व्यतिरिक्त अशा ट्रेन फक्त जपानमध्ये धावतात, ज्यांना सस्पेंशन रेल्वे म्हणतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Germany suspension railway where train run under the track amazing hanging train