Why Guru Purnima is celebrated : हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना मग ते शिक्षक असो किंवा मार्गदर्शक त्यांचे आभार मानतात. गुरूसमोर नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतात. यादिवशी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या गुरूंना पुष्पगुच्छ, फळे आणि काही भेटवस्तू सुद्धा देतात.. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरुंना समर्पित केला जातो

पण तुम्हाला माहितीये का, गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व काय? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते?

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशीच गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? कारण या दिवशी महाभारताची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांची जयंती असते. म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पण गुरूपौर्णिमा म्हणजे फक्त वेद व्यासांची जयंती एवढंच नाही तर त्याबरोबर आणखी एक आख्यायिक आहे की गुरूपौर्णिमेच्या दिवशी सप्तर्षींना (सात ऋषींना) भगवान शंकरांनी योगाचे ज्ञान दिले होते. त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित असून गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

गुरुपौर्णिमेची तारीख आणि तिथी (Guru Purnima 2025 Date And Tithi)

वैदिक पंचांगानुसार, यंदा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात १० जुलै रोजी पहाटे १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल.

गुरूपौर्णिमेसाठी मंत्र

ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

या मंत्राच अर्थ असा होतो की गुरू हा ब्र्ह्मासमान आहे जो सृष्टीची रचना करतो. गुरू विष्णु समान आहे जो सृष्टीचे पालन करतो आणि गुरू शंकरासमान आहे जो सृष्टीचे संहार करतो. गुरू हे स्वत:परम सत्य आहे, त्या गुरूंना माझा नमस्कार.”