Viral Video: स्वतःच घर सर्वांना प्रिय असतं, मग तो माणूस असो किंवा प्राणी. पण समजा तुम्हाला न सांगता एखाद्या दिवशी कोणीतरी आलं आणि काही क्षणात तुमचं घर तोडून टाकलं तर.. विचारही करता येत नाही ना? पण हे असंच काहीसं एका व्हायरल व्हिडीओ मध्ये इवल्याश्या जीवांबरोबर झाल्याचं दिसून येत आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. भारतीय वन्याधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली आहे.
व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की एका भल्यामोठ्या झाडावर पक्षांचं कुटुंब घोळका करून बसलंय, इतक्यात काही व्यक्ती जेसीबी घेऊन तिथे येतात आणि झाड तोडण्याचे काम सुरु करतात. काही कळायच्या आत झाड मोडून पडतं आणि त्यासोबतच झाडावर बसलेले ते इवलेसे जीवही खाली कोसळतात. यातील लहान पिल्लं झाडाच्या फांद्यांखाली, खोडाखाली दबून जागीच मृत्यू पावतात. हा व्हिडीओ बघताना आपल्याला जितका त्रास होत असेल त्याच्या कित्येक पटीने वेदना या पक्षांना होताना दिसत आहेत. (Video: बैलाला बघून वाघाने केलं असं काही की नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही, तुम्हीच पाहा)
परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “आपल्याला सर्वांना आपले घर हवे असते, आपण इतके क्रूर कसे झालो” असा सवाल करत कॅप्शन दिले आहे. हे हृदयविदारक दृश्य पाहून अनेकांनी खेद व्यक्त केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान, द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील रांदथनी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर हे झाड तोडण्यात आले आहे असे समजतेय. या घटनेबाबत केरळ वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्तानुसार, अधिकृत मंजुरीशिवाय झाड तोडण्यात आले असल्याने जेसीबी चालकाला अटक करण्यात आली.