...अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, "...म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही"; सभागृहात पिकला एकच हशा | in front of CM Eknath Shinde Devendra Fadnavis says there are two mic and no written note in todays press conference scsg 91 | Loksatta

…अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूलाच बसले होते

Devendra Fadnavis Eknath Shinde Press
मुंबईमधील पत्रकार परिषदेत घडला हा प्रकार

सत्तांतरणानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत महाविकास आघाडीचा निर्णय कायम ठेवत असल्याची घोषणा केलीय. यासंदर्भात ‘सह्याद्री’ येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी माईक खेचल्याच्या प्रकऱणावरुन त्याचप्रमाणे चिठ्ठी प्रकरणावरुन हलक्यापुलक्या शब्दांमध्ये भाष्य करताच सर्व उपस्थित पत्रकार हसू लागले.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

खुर्ची शिंदेंच्या बाजूला सरकवण्याचा सल्ला…
आज दुपारी बाराच्या सुमारास बैठक झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी फडणवीस आणि एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आसनस्थ झाले. त्यावेळी फडणवीस यांच्यासमोर एक माईक होता तर शिंदेंसमोर प्रसार माध्यमांचे बुम (माईक) ठेवण्यात आलेले. खुर्चीवर बसल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या समोरील माईक सुरु आहे की नाही हे तपासून पाहिलं. प्रत्यक्ष पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीच्या या तयारीदरम्यान पत्रकारांनी फडणवीस यांना थोड शिंदेंच्या बाजूला सरकण्याचा सल्ला दिला.

नक्की वाचा >> “त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला

“अरे तुम्ही जवळ आल्यावर…”
त्यानंतर फडणवीस यांनी आपली खुर्ची एकनाथ शिंदेंच्या बाजूला सरकवली. तेव्हा शिंदेंनीही त्यांना जागा करुन घेण्याच्या उद्देशाने खुर्ची सरकवली असता फडणवीस यांनी त्यांना ‘तुमची इकडे करा (खुर्ची)’ असं हातवारे करुन खुर्ची जवळ घेण्यास सांगितलं. त्यावरुन शिंदे यांनी, “अजून परत यावरुनही काहीतरी बोलत राहतील (पत्रकार)” असं म्हटलं. तेवढ्यात एका पत्रकाराने सर जवळ जवळ बसा असं शिंदे यांना सांगितलं. त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी, “अरे तुम्ही जवळ आल्यावर लांब करता आम्हाला. असं काय करताय,” असं म्हटलं अन् पत्रकार हसू लागले.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> “ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून…”; ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वाभिमानी होते’ म्हणत सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला

फडणवीस यांना झाली चिठ्ठी आणि माईकची आठण
हा सर्व संवाद ऐकून फडणवीस यांनी, “म्हणून आज दोन माईक ठेवलेत,” असं म्हटलं आणि पत्रकारांचा एकच हशा पिकला. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी दुसरा टोला लगावताना “आणि कुठलीही चिठ्ठी नाही,” असंही म्हटलं. यानंतरही सर्व पत्रकार हसू लागले.

नक्की पाहा >> Photos: २०२० मध्ये शिंदेंचाच होता विरोध अन् काल मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केली ‘या’ निर्णयाची घोषणा; BJP ला होणार मोठा फायदा

माईक खेचण्याचा प्रकार नेमका काय?
हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोर शिंदे गटामध्ये सहभागी झाले. यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांना बांगर कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात आले असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. हा प्रश्न शिंदे यांना पटकन समजला नाही. ते थोडे गोंधळतच, “कुठल्या पक्षातून आले म्हणजे…” असं म्हणत असतानाच बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचून स्वत: समोर घेत, “ते खऱ्या शिवसेनेत आले,” असं उत्तर दिलं आणि हसत पुन्हा माईक शिंदेंसमोर ठेवला. या साऱ्या प्रकरणावरुन सोशल मीडियाबरोबरच विरोधकांनीही फडणवीसांची ही कृती खटकल्याची टीका केली होती.

नक्की पाहा >> Photos: ‘शिवतीर्थ’वर फडणवीसांचं औक्षण, भगवी शाल अन्…; राज ठाकरेंच्या घरी असा झाला उपमुख्यमंत्र्यांचा पाहुणचार

चिठ्ठी प्रकरण काय?
दोनच दिवसापूर्वी झालेल्या अन्य एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील निर्णय जाहीर करताना
भाजपाचे आमदार दनंजय महाडिकांचं नाव विसरले होते. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकार परिषद सुरु असतानाच चिठ्ठी लिहून त्यांना आठवण करुन दिली होती. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. याच दोन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनी पत्रकार परिषद सुरु होण्याआधीच पत्रकारांना आज असं काही होणार नाही असं सूचित केलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-07-2022 at 13:54 IST
Next Story
हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण