जगभरात एकसारखे दिसणारे अनेक लोक सापडतात; जे हुबेहूब एकमेकांसारखे दिसतात. त्यांना पाहून अनेकांना या दोघांमधील नेमकं खरं कोण आणि खोटं कोण, असा प्रश्न पडतो. शिवाय सोशल मीडियावरही आपण अशा अनेक लोकांना पाहतो; जे एखाद्या फेमस कलाकारासारखे दिसतात आणि त्यांच्या स्टाईलमध्ये वेगवेगळी रील्स शूट करतात. पण, सध्या सोशल मीडियावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती रस्त्यावर कुल्फी विकताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानात कुल्फी विकणारा हा माणूस रातोरात फेमस झाला आहे. त्याचं कारण म्हणजे तो हुबेहूब अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती कुल्फी विकताना दिसत आहे आणि ती अनोख्या अंदाजात गाणंही म्हणत आहे. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो माणूस त्याच्या गाण्यांमुळे किंवा कुल्फीमुळे नव्हे, तर तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत असल्यामुळे फेमस झाला आहे. या कुल्फीविक्रेत्याचा चेहरा हुबेहूब ट्रम्प यांच्यासारखा असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जर डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म पाकिस्तानात झाला असता, तर…” कुल्फीविक्रेत्याचा हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर दोन मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक जण या व्हिडीओतील व्यक्तीच्या आवाजाचं कौतुक करीत आहेत. काही जण या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं गमतीनं लिहिलंय “ट्रम्प पाकिस्तानमध्ये कुल्फी विकत आहेत.” तर आणखी एकानं लिहिलंय “पाकिस्तानातील ट्रम्प.”