Lalbaugcha Raja 2025 Viral Video: यंदा २७ ऑगस्टला गणरायाचं आगमन घराघरात, मंडळांमध्ये झालं आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. भारतात प्रामुख्यानं मुंबई, पुण्यात गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात धामधूम असते. सगळीकडेच जल्लोष अन् आनंदाचं वातावरण असतं. अशात मुंबईतील लालबागमधील नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण लांबचा पल्ला गाठून येतात. रांगेत तासन् तास उभे राहण्याचे कष्ट घेतल्यानंतर कुठे बाप्पाचं दर्शन त्यांना मिळतं. तर दुसरीकडे मोठमोठे व्यापारी, कलाकार, फेमस पर्सनॅलिटी यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन असतं, ज्यामुळे अगदी काहीच मिनिटांत दर्शन घेता येतं. पण, त्यामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आणि हा मनाला सतावणारा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या आहेत. देवासमोर हात जोडून, मस्तक टेकवून, ते बाप्पाकडे प्रार्थना करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mamaharashtrachaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओला ‘हे सिद्ध झालं की, माणसापेक्षा आणि श्रद्धेपेक्षा पैसा महत्वाचा आणि पैसा असणारी माणसंसुद्धा…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच ‘या व्हिडीओवर यांना का नाही कोणी धक्का मारला, काय करायचं अशा श्रद्धेचं’ असं व्हिडीओवर लिहिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ३.२ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “या लोकांमुळे जे बिचारे १२-१३ तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनासाठी आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांचं काय…? बाप्पा नक्की कोणाचा आहे श्रीमंतांचा की गरिबाचा.” तर दुसऱ्यानं, “इतकी धक्काबुक्की होऊनपण लोक तिथे जात असतात. घरातील गणपती बाप्पाकडे बसायला दोन मिनिटंसुद्धा नाहीत लोकांकडे”, अशी कमेंट केली. तर, एक जण कमेंट करीत म्हणाला, “गरीब अन् श्रीमंतांमधला फरक.”