Viral Video: आयुष्यात रडत, कुरकुरत, एखाद्याचा बदला घेण्याची भावना मनात ठेवून नकारात्मक आयुष्य जगायचं की मदतीची भावना, दुसऱ्याच्या आनंदात खूश होऊन, कृतज्ञता मनात ठेवून सकारात्मक आयुष्य जगायचं हे आपल्यावर अवलंबून असते. विचार हे माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. परदेशात ट्राममध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करतो हे पाहून तेथील प्रवासी अजिबात खूश होत नाहीत, हे पाहून कंटेन्ट क्रिएटरने एक खास मेसेज देऊन व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हायरल व्हिडीओ नेदरलँडमधील आहे. एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीला हटके स्टाईलमध्ये प्रपोज करण्याचे ठरवले. धावत्या आणि प्रवाशांनी भरलेल्या ट्राममध्ये, तरुण त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करताना दिसत आहे. तरुण गुडघ्यावर बसतो आणि त्याच्या मैत्रिणीला अंगठी घालतो. ट्राममध्ये एक कंटेन्ट क्रिएटरदेखील उपस्थित असतो. तो हे दृश्य पाहून त्याच्या मोबाइलमध्ये हा क्षण कैद करून घेत असतो. पण, त्याला व्हिडीओ शूट करताना प्रवाशांचे हावभाव पाहून आश्चर्य वाटते. मैत्रिणीला प्रपोज करणाऱ्या तरुणाला पाहून प्रवाशांनी कसे हावभाव केले, ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा

हेही वाचा…दुचाकीवरून मांजरीचा प्रवास; तरुणाच्या पाठीवर टेकवले पाय अन्… पाहा ‘हा’ मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण गुडघ्यावर बसून मैत्रिणीला अंगठी घालून प्रपोज करतो. पण, हे पाहून कोणतेच प्रवासी खूश होत नाहीत किंवा टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदनदेखील करत नाहीत. फक्त ट्राममध्ये उपस्थित असलेला कंटेन्ट क्रिएटर या खास क्षणाला फोनमध्ये शूट करताना दिसत आहे. तसेच फोन नंतर मांडीवर ठेवून टाळ्यादेखील वाजवत आहे; असे सेल्फी कॅमेरामधून दिसून येत आहे. कोणताही प्रवासी या नवीन जोडप्याच्या आनंदात सहभागी झाला नाही म्हणून कंटेन्ट क्रिएटरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून एक खास मेसेज लिहिला आहे.

इतर प्रवासी आनंदात सहभागी न झाल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. बहुतेक लोक त्यांच्या फोनमध्ये व्यस्त होते, तर इतरांनी अक्षरशः दुर्लक्ष केले. त्यावर व्हिडीओ शूट करत कंटेन्ट क्रिएटर म्हणताना दिसते आहे की, ‘प्रवासी असे का वागत आहात की हा कोणताही खास क्षण नाही? त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा वा अभिनंदन म्हणा. कारण त्यांच्यासाठी हा एक विशेष क्षण आहे. पण, प्रत्येक जण असे वागत आहे की, काही घडलंच नाही. कोणीतरी नुकतंच त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केले आणि सर्व प्रवासी लोक तुमच्या फोनमध्ये व्यस्त आहेत, तुम्हाला प्रेम आवडत नाही का? अशी खंत तिने व्हिडीओत व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @onyisimadagaska नेदरलँडची कंटेट क्रिएटर ओनिसी लायन हिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.