कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आता काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात सांगड घालण्याबाबत जागरुकता वाढत आहे. त्यामुळेच अनेक कर्मचारी आता वेळेवर घरी निघण्याचा प्रयत्न करतात. तरी काही कर्मचारी वेळेच्या आधीच घरी निघून जातात. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधण्याची संकल्पना रुजू होत असतानाच बंगळुरूमधील एका कर्मचाऱ्याने लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोला लगावला आहे. सागर लेले नामक व्यक्तीने एक्स या साईटवर टाकलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लवकर घरी जाणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका या व्यक्तीने केली. मात्र एक्सवर अनेकांनी या व्यक्तीलाच सुनावले आहे. लोक या विषयाबाबत काय मते व्यक्त करत आहेत. पाहुयात.

सागर लेले नामक व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “एकेकाळी मी सकाळी ७ वाजता कार्यालयात येत होतो आणि मध्यरात्री २ वाजता कार्यालयातून बाहेर पडत होतो. सर्वात आधी येणारा आणि सर्वात शेवटी बाहेर पडणारा मी एकमेव होतो. मी खालील फोटोत बंगळुरूमधील एका कार्यालयाचा फोटो देत आहे. ज्यामध्ये कर्मचारी ६.३० वाजताच कार्यालयाबाहेर पडले आहेत. यांना लाज कशी वाटली नाही.” या पोस्टसह सागर लेले याने सदर मोकळ्या कार्यालयाचा फोटोही जोडला आहे.

१८ जून रोजी सदर पोस्ट टाकली होती. त्यानंतर जवळपास सहा लाख लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. एक हजारहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. तर तेवढ्याच लोकांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी सागर लेलेने व्यक्त केलेल्या विचारावर असहमती दर्शविली आहे.

लोकांनी काय मत नोंदविले?

रोहित गुप्ता नामक युजरने म्हटले की, तुम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे काम केले. पण इतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा.

आणखी एका युजरने म्हटले, तुम्हाला तुमच्या समर्पक वृत्तीबद्दल सुवर्ण पदक द्यावे का? माफ करा. पण आताचे कर्मचारी स्मार्ट झाले आहेत. जास्त वेळ कार्यालयात बसणे म्हणजे जास्त काम होणे, असे नाही. आठ तास एकाग्रवृत्तीने काम करणे अधिक फलदायी ठरते. उरलेला वेळ माझ्या कुटुंबाचा आणि माझा आहे. टेस्ला किंवा स्पेसएक्स सारख्या कंपन्यांत कुणी रात्री २ वाजता घरी जाऊन सकाळी ६.३० ला आलेले पाहायला मिळाले तर मला आनंद वाटेल. पण भारती कंपन्या बऱ्यापैकी सर्वोत्तम कामगिरी करत आहेत.

आणखी एका युजरने म्हटले की, आयुष्य जगा. खूप उशीर होण्यापूर्वी जगणे सुरू करा. तुमचे काम मोजले जाते, कामाचे तास नाही.

डॉ. देवाशिष पालकर नावाच्या एका युजरने म्हटले की, तुम्ही ही पोस्ट लिहून अपलोड करण्यात १२० सेकंद घालवले. याऐवजी तुम्ही आणखी एखादी तोट्यात जाणारी कंपनी उभारण्यासाठी वेळ देऊ शकता किंवा लिंक्डइनवर आत्ममग्न प्रेरणादायी पोस्ट लिहिण्यावर किंवा गेला बाजार एखाद्या पॉडकास्टवर जाऊन तुमच्या यशावर बोलू शकता.