महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळेस ते फेसबुकवरील एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. फेसबुकवरुन पुण्यात एका महिलेसोबत घडलेला प्रसंग शेअऱ करत वसंत मोरेंनी, ‘थोडे तरी शहाणे व्हा’ असा सल्ला नागरिकांना दिलाय. वसंत मोरेंनी पुण्यामधील पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकाने कशाप्रकारे एका महिलेला मदत केली यासंदर्भातील प्रसंग फोटोंसहीत आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितलाय.

वसंत मोरे फेसबुकवर लिहितात, “वेळ रात्री पावणे बाराची, ठिकाण :- कात्रज कोंढवा राजस चौक. मी काल नेहमी प्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएमएलची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीटवर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे?.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालक आणि वाहकाकडे चौकशी केल्यानंतर, “ते बोले की आम्ही सासवडवरून आलोत गाडीत एक महिला आहे. तिच्याकडे छोटे बाळ आहे. त्या इकडेच बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की, त्यांना राजस चौकात त्यांचा दिर घ्यायला येईल, पण १५ मिनिटं झाली कोणचं येत नाही आणि फोन लागत नाही. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण आता रिक्षा ही मिळत नाही,” अशी आपली अडचण त्यांनी दिली. पुढे मोरे लिहितात, “त्यांचा दिर नाही आला म्हणून काय झाला मीच त्यांचा दिर झालो. त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटो ही काढला पण खरे धन्यवाद त्या एमएच १२ आर एन ६०५९ बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला. त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे ‘नागनाथ नवरे’ आणि ‘अरुण दसवडकर.”

“एक चूक घरच्यांचीही आहे. या एकट्या ताईला इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडलं? बरं सोडलं तर मग घरी नेण्यासाठी येताना इतका निष्काळजीपणा का केला? थोडे तरी शहाणे व्हा”, असा सल्लाही मोरेंनी पोस्टच्या शेवटी दिलाय.

सध्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील अनेक पेसेजने ही पोस्ट शेअर केली असून सर्वांनीच कर्तव्य बजावण्याबरोबरच त्या महिलेची काळजी घेणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकाचं कौतुक केलंय. मोरेंच्या या पोस्टला १८ तासांमध्ये २६ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक जणांनी त्यावर कमेंट्स केल्यात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns corporator vasant more post goes viral scsg