Man Punished For 170 Years: कपड्यांची फॅक्टरी सुरू करण्याच्या बहाण्याने ३४ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील सागर येथील सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला १७० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या इसमाने एकूण ३४ जणांना ७२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. यापूर्वी मार्चमध्ये, सिहोर (मध्य प्रदेश) च्या एका चिटफंड कंपनीच्या संचालकाला २५० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणात तर आरोपीने तब्बल ३.५ दशलक्ष पीडितांना ४००० कोटींचा गंडा घातला होता. यापाठोपाठ आता १७० वर्षांची शिक्षा हे देशातील सर्वात दीर्घकाळ तुरुंगवासाचे प्रकरण ठरले आहे.

तुरुंगवासाच्या शिक्षेव्यतिरिक्त, ५५ वर्षीय नासिर मोहम्मद उर्फ ​​नासीर राजपूत याला न्यायाधीशांनी पीडितांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तापी, गुजरातचा रहिवासी मोहम्मदला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. ज्यानुसार आरोपीला कमाल सात वर्षांची शिक्षा सुनावली जाते.

या खटल्यात मोहम्मदला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती पण निकालात उच्च सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल्ला अहमद म्हणाले की, “दोषीने ३४ लोकांची फसवणूक केली होती. प्रत्येक पीडितेच्या बाबतीत स्वतंत्रपणे शिक्षा होणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक पीडितेच्या बाबतीत आरोपीने केलेल्या गुन्ह्याची जबाबदारीही वेगळी असते. याचा अर्थ आता मोहम्मदला ३४ x ५ म्हणजेच १७० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोहम्मदने ३४ जणांना कसं फसवलं?

जिल्हा फिर्यादीचे मीडिया प्रभारी सौरभ दिम्हा यांनी सांगितले की, सागर जिल्ह्यातील भैंसा आणि सदर गावातील रहिवाशांनी २०१९ च्या उत्तरार्धात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध कारवाई केली. मोहम्मद हा २०१८ मध्ये या भागात राहायला गेला होता त्यावेळेस त्याचे स्थानिकांशी चांगले संबंध निर्माण झाले. त्याची जीवनशैली पाहता तो फसवणूक करेल असा कोणाला संशय आला नाही.

स्थानिकांना विश्वासात घेतल्यावर त्याने आपली बनावट कहाणी ऐकवण्याची सुरुवात केली, “स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून मिळणार्‍या रकमेची तो कपड्याच्या कारखान्यात गुंतवणूक करणार होता पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही करसंबंधित समस्यांमुळे ७.८५ कोटी हस्तांतरणास स्थगिती दिली होती. माझी मुलं कंबोडिया, व्हिएतनाम आणि दुबईमध्ये कपड्यांचे व्यवहार करतात” असे त्याने सर्वांना सांगितले.

हे ही वाचा<< नरेंद्र मोदींची मेट्रोमध्ये अचानक एंट्री! लोक भडकून म्हणतात, “ऑफिसच्या वेळी कोंडी केली, स्टेशन वरून गर्दीला…”

यानंतर हळूहळू आमिषाला भुलून स्थानिकांनी गुंतवणूक केली. यातील एका गुंतवणुकदाराने पैसे परत करण्यासाठी दबाव टाकल्यानंतर मोहम्मद फरार झाला. त्याचे कुटुंबही बेपत्ता झाले. त्याला १९ डिसेंबर २०२० रोजी कर्नाटकातील कुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती.