Wedding Bride Dance Video: सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो, त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने खास प्रयत्न करत असतो. लग्न म्हटलं की सुंदर तयार झालेली नववधू लगेच आठवते. तिचा लाल लेहंगा, चमकदार दागिने आणि एकूणच तिचा लूक सर्वांचं लक्ष तिच्याकडे खेचतो. लग्नसोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते ती नवरीची एंट्री. पाहुणे मंडळी नवरीचा लूक आणि हटके स्टाईल बघण्यासाठी खूप उत्सुक असतात. अनेक ठिकाणी नवरीमुलगी पालखीतून येताना दिसते तर कुठे डोलीतून, काही वधू बाईकवरून तर काही नाचत हॉलमध्ये एंट्री करताना दिसतात. काहींची रॉयल एंट्री तर काहींचा भन्नाट डान्स, असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्यासमोर येतात. आता अशाच एका उत्साही नवरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…
लग्न म्हटलं की मंगलमय वातावरण, विधी, मंत्र आणि वेळेचं काटेकोर पालन. पण, सध्या एका नवरीचा हट्ट साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने सगळ्यांना चकित केलंय. ही घटना नेमकी कुठल्या ठिकाणची आहे ते अद्याप समजले नाही. मात्र घडलं असं की, लग्नाची सर्व तयारी झाली होती, मंडप सजलेला होता, सर्व वऱ्हाडी मंडपात पोहोचले होते आणि पंडित मंत्रोच्चार करत मुहूर्ताची वेळ सांभाळत होते. पण, नवरीबाई मात्र एंट्रीसाठी तयार होत होती आणि ती काही साधी-सरळ एंट्री नव्हती, तर डान्स करत स्टेजवर येण्याचा तिचा आग्रह होता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते की, लग्न मंडपात सर्व पाहुणेमंडळी बसलेले आहेत. लग्नाला आधीच उशीर झालाय. परंतु, नवरीचे वेळेकडे काही लक्ष नाही. लग्नाच्या मुहूर्ताचा काहीच विचार ती करत नाहीये. ती आपल्या लग्नाच्या एंट्रीला “मराठमोळा थोडासा साधा भोळा…” या गाण्यावर डान्स करत करत येतेय. मुहूर्ताची वेळ हातातून जात असल्याचं लक्षात येताच, लग्न लावणारे पंडित स्वतः स्टेजवरून खाली उतरून नवरीकडे गेले आणि नवरीला विनंती केली, “कृपया आता येऊन लग्नविधी पूर्ण करा, मुहूर्त निघून जातोय!” पण, नवरीने हातवारे करत इशारा करून सरळ नकार दिला. तिला नाचल्याशिवाय स्टेजवर जायचंच नव्हतं. सर्व पाहुणेमंडळी तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले. पंडितांनाही काही सुचेनासे झाले. ते काही न बोलता तिथून आपल्या जागेवर गेले. हा प्रकार वऱ्हाड थांबून बघत होतं. काहींनी मोबाइल काढून हा क्षण कॅमेरामध्ये कैद केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
हा व्हिडीओ Marathiduniyaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये “खरंच लग्नाच्या मुहूर्ताला काहीच किंमत राहिली नाही” असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं, “शाळेत गॅदरींगमध्ये कोणी घेतलं नसेल नाचायला… म्हणून हौस फेडून घेतेय”, तर दुसऱ्याने लिहिलं, “लग्नात डान्सवर बंदी आली पाहिजे.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.