सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं सर्वांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. मुंबई असेल पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड सर्वच ठिकाणी आता लोकं मास्क घालून वावरताना दिसतात. पण हल्ली कोणी काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चांदीचा करोना मास्क तयार केलेल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. त्यांनी चक्क ६० ग्रॅम चांदीचा एक मास्क तयार करून घेतला होता. त्याची किंमत ३ हजार ९०० रूपये इतकी होती. परंतु पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ना, तशीच एक माहिती पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे.

शंकर कुऱ्हाडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी कपड्याचा, एन ९५ किंवा अन्य कोणताही मास्क न घेता चक्क सोन्याचाच मास्क तयार करून घेतला आहे. हा मास्क साधारणपणे साडेपाच तोळ्यांचा असून त्यासाठी त्यांनी २ लाख ८९ हजार रूपयांचा खर्च केला आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी ते या मास्कचा वापर करत आहेत.

दरम्यान, त्यांचा हा मास्क पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या मास्कमध्ये श्वास घेण्यासाठी छोटी छिद्रही करण्यात आली आहे. कऱ्हाडे यांच्याकडे पाहून त्यांना सोन्याचीही आवड असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतही एका व्यक्तीनं करोनापासून वाचण्यासाठी चांदीचा मास्क तयार केला होता.