Snake Bite Death Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेच व्हिडीओ काळजाला भिडणारे, तर काही काळजाचा ठोका चुकविणारे असतात. दरम्यान, आता असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बागपतमधील आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. शुक्रवारी रात्री छपरौलीतील लुंब गावातील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करणारा मनोज (वय १७) झोपला होता. तो झोपेत असतानाच त्याला महाकाय किंग कोब्रा या सापाने दोनदा दंश केला आणि त्यामुळे त्याचा काही मिनिटांत मृत्यू झाला आहे. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

किंग कोब्राने दंश करताच तरुणाला डॉक्टरकडे नेण्यात आले; पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हॉटेलमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तरुणाला झोपेत किंग कोब्रा साप दंश करतानाची संपूर्ण धक्कादायक घटना कैद झाली आहे. दरम्यान, कूक मनोजच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्या सापाला पकडले.

लुंब गावातील रहिवासी मनोज हा गावातील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करीत होता, दिवसभर हॉटेलमध्ये काम केल्यानंतर रात्री तो हॉटेलमध्येच झोपायचा. शुक्रवारी रात्रीही मनोज हॉटेलमधील एका खोलीत झोपला होता. यावेळी रात्री साडेतीन वाजता हॉटेलच्या खोलीत एक साप शिरला आणि तो मनोजच्या अंथरुणावर चढून तिथे फिरू लागला. यावेळी त्याने मनोजच्या हाताला दंश केला, ज्यामुळे मनोज झोपेतून ताडकन उठला आणि अंथरुणापासून दूर होत आजूबाजूला पाहू लागला. यावेळी त्याला काहीच दिसले नाही म्हणून तो पुन्हा त्याच पलंगावर झोपी गेला.

पण, तो किंग कोब्रा तिथेच पलंगावर फिरत राहिला आणि त्याने मनोजच्या पोटावर पुन्हा दंश केला. त्यामुळे मनोज झोपेतून जागा झाला आणि उठताच त्याला बेडवर एक साप दिसला. तो बाहेर आला आणि हॉटेलमालकाला फोन करून, त्याने त्या दुर्घटनेची माहिती दिली. हॉटेलमालक गाडी घेऊन आला आणि मनोजला किर्थल गावातील एका डॉक्टरकडे घेऊन गेला.

डॉक्टरांनी तिथे उपचार सुरू केले; पण मनोजची प्रकृती खूप बिघडू लागली. तेथे उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मनोज दोन भावांमध्ये लहान होता. त्याचा मोठा भाऊ अनुज मजूर म्हणून काम करतो. त्याच्या वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले.

गावप्रमुख बहादूर सिंह म्हणाले की, मनोज खूप मेहनती होता आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली पाहिजे. मनोजच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी लोकही प्रशासनाकडे करीत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.