लहानपणी शाळेत असताना, मधल्या सुट्टीत किंवा शिक्षकांचे लक्ष नसताना, गुपचूप आपण कितीतरी खेळ खेळायचो. त्यामध्ये, ‘पेन फाईट’, काचा-पाणी किंवा वहीच्या मागच्या पानांवर नाव, गाव, फळ, फूल, बिंदू जोडण्याचे खेळ, फुल्ली-गोळा खेळायचो. वहीची मागची दहा-बारा पानं तर हमखास फुल्ली-गोळा खेळूनच भरलेली असायची.

मात्र, जशी शाळा सुटली तसे हे हलके-फुलके खेळ खेळणेही बंद झाले. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका भन्नाट व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये फुल्ली गोळ्याचा खेळ खेळला जात आहे. मात्र, यात विशेष आकर्षण हे, हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचे आहे. कारण हा खेळ एक व्यक्ती आणि एक कावळा खेळत असल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. हा त्या व्यक्तीचा पाळीव कावळा आहे.

हेही वाचा : Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @voron_gosha_tv नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊ खाचे असलेला एक लाकडी बोर्ड दिसतो. फुल्ली-गोळा खेळण्यासाठी पांढऱ्या रंगाचे x आकाराचे लाकडी ठोकळे आहेत, तर गोळ्यांसाठी लाल रंगांच्या लाकडी बदामाचा आकार असलेल्या ठोकळ्यांचा वापर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला एका कोपऱ्यातील चौकोनात लाल रंगाचा बदाम ठेवून कावळ्याने खेळाची सुरुवात केली. नंतर त्या कावळ्याच्या मालकाने त्याची फुल्ली, लाल बदामाखाली ठेवली. नंतर अजून दोन-तीन वेळा दोघांनी त्यांचे-त्यांचे डाव खेळल्यानंतर, शेवटी कावळ्याने आपला शेवटचा बदाम मधल्या रकान्यात ठेवून फुल्ली-गोळा खेळ संपवला. या खेळाचा विजेता अर्थातच चतुर कावळा ठरला.

आपण जिंकलो हे त्या कावळ्याला समजताच चोच उघडून त्याने त्याच्या जिंकण्याचा झालेला आनंद व्यक्त केला. अर्थात, त्याच्या या हुशारीसाठी त्या कावळ्याच्या मालकाने बक्षीस म्हणून त्याला खाऊ खायला दिला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.

हेही वाचा : चित्रातील मोनालिसा बनली रॅप गायिका! पाहा मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ App ची कमाल; Video होतोय व्हायरल….

“बापरे, जिंकल्यावर किती खूश झालाय तो कावळा.. किती गोड”, असे एकाने लिहिले आहे.
“वाह! कावळ्याला हा खेळ खूपच चांगल्या पद्धतीने समजला आहे, किती हुशार आहे तो”, असे दुसऱ्याने लिहिले.
“मलापण या कावळ्यासारखे साधे-सोपे आयुष्य हवे आहे…”, असे तिसऱ्याने म्हटले.
“आता मलापण कावळा पाळायची इच्छा होत आहे”, असे चौथ्याने लिहिले.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला आत्तापर्यंत ५० मिलियन्स इतके व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर २.३ मिलियन लाइक्स मिळाले आहेत.