रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीपासून हल्ला चढवला असून या घटनेला येत्या २४ एप्रिलला दोन महिने पूर्ण होणार आहेत. या युद्धात युक्रेनी सैनिकांना लक्ष्य केलं जात असून सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे. युक्रेनचे सैनिक मोठ्या धैर्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत. या युद्धाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा एक दैवी चमत्कार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. रशियन सैनिकांना युक्रेनी सैनिकावर बंदुकीची गोळी झाडली होती. ही गोळी बरोबर कंबरेवर लागली होती. त्यामुळे त्याचा प्राण गेला असंच युद्धभूमीवरील सैनिकांना वाटलं. पण दैव बलवत्तर होत म्हणून एका स्मार्टफेोनने सैनिकाचे प्राण वाचले.

Raw Ukraine Videos युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत दोन युक्रेनी सैनिक या घटनेबाबत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यात एक युक्रेनी सैनिक बोलता बोलता खिशात हात घालतो आणि खिशातील स्मार्टफोन बाहेर काढतो. त्यात स्मार्टफोनमध्ये बंदुकीची गोळी आरपार गेल्याची दिसते. गोळीचा आकार तब्बल ७.६२ मिमी इतका आहे. जर ही गोळी लागली असती तर सैनिकाचा जीव गेला असता. स्मार्टफोन दाखवत सैनिक म्हणतो, ‘स्मार्टफोनने माझे प्राण वाचले.’

अजुनही रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही, एवढंच काय मोठ्या भागावर युक्रेनचेच नियंत्रण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या युद्धात रशियाची अनेक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांना युक्रेनने जोरदार प्रतिकार करत जमिनीवर आणले आहे. एका माहितीनुसार ४०० पेक्षा जास्त रणगाडे, एक हजार पेक्षा जास्त चिलखती वाहने रशियाने या युद्धात गमावली आहेत.