Snake Viral Video : शहरातील काँक्रीटच्या जंगलात साप फारसे दिसत नाहीत. पण, ग्रामीण भागात अनेकदा सापांचे दर्शन घडत असते. अगदी रस्त्यावरून चालतानाही समोरून साप सरपटत जाताना दिसतो, त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना खूप काळजीपूर्वक आणि सतर्क राहावे लागते. विशेषत: कडक उन्हाळ्यात थंडाव्याच्या शोधात साप मानवी वस्तीत शिरताना दिसतात. अनेकदा ते लोकांच्या घरात अशाकाही ठिकाणी जाऊन लपतात की तुम्ही विचारही करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एका सापाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सापाच्या भीतीने घरात चुकूनही एका विशिष्ट डिझाइनची खुर्ची खरेदी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण, असे का जाणून घेऊ…
तुमच्यापैकी अनेकांच्या घरात व्हिडीओत दिसणारी खुर्ची असेल. या खुर्चीच्या मागच्या बाजूला दोन मोठे खाच आहेत, ज्यात अनेक लहान-सहान वस्तू जाऊन अडकतात. केवळ वस्तूच नाही तर साप, किडेही सहज त्या खाचेत आपली जागा करून राहू शकतात.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्या खुर्चीकडे बोट दाखवत सापाच्या भीतीने लोकांना विनंती करतोय की, पाहा मित्रांनो, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की अशा प्रकारच्या खुर्च्या खरेदी करू नका. यावेळी तो कॅमेरा खुर्चीच्या मागच्या एका पायावर झूम करून दाखवतो. यावेळी खुर्चीच्या पायात एक लहानसा साप शरीराचे वेटोळे करून बसलेला दिसतोय. ती व्यक्ती व्हिडीओत असेही सांगते की, खुर्चीच्या आत उंदीर मारण्याचं औषधं ठेवलं आहे, तरीही तो साप खुर्चीत सहजपणे जाऊन बसला आहे. फक्त सापच नाही तर इतर कोणतेही छोटे प्राणी त्या खुर्चीच्या पायांच्या खाच्यांमध्ये सहज बसू शकतात. जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसता, तेव्हा तो लपून बसलेला साप तुम्हाला चावण्याची शक्यता असते.
सापाच्या भयानक व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
सापाचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @jptomar1114 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी संमिश्र स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी म्हटले आहे की, खुर्चीवर अशी रचना करण्याची गरज काय होती? त्यात लहान मुलांचे पायही अडकतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, घरातही साप असतात, मग आपण घरावरही बहिष्कार टाकला पाहिजे का? काही युजर्सनी विचारले की, साप तिथे कसा पोहोचला? अनेकांनी व्हिडीओवर शंका व्यक्त करत म्हटले की, व्हिडीओ काढण्यासाठी सापाला मुद्दाम त्या खुर्चीच्या खाचेत ठेवण्यात आले होते.