नागरी वस्तीमध्ये वन्य प्राणी येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी बिबटे, कोल्ह्यांसारखे हिंस्त्र प्राणी देखील रात्रीच्या वेळी फिरत असल्याचं दिसून आलं आहे. अशाच एका थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ म्हणजे एका घराबाहेरचं सीसीटीव्ही फूटेज आहे. या व्हिडीओमध्ये एका घराबाहेरचं अंगण दिसत असून तिथे एक पाळीव कुत्रा गेटकडे बघून भुंकत असल्याचं दिसत आहे. काही क्षण भुंकल्यानंतर अचानक हे कुत्र भितीने आतल्या बाजूला धावत गेलं. पण अवघ्या काही सेकंदातच समोरच्या किमान पुरुषभर उंचीच्या गेटवरून उडी मारून एक बिबट्या चपळाईनं आत आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आत येताच बिबट्या थेट कुत्र्याच्या दिशेनं गेला. काही क्षण समोर काहीच दिसत नसताना फक्त कुत्र्याच्या आवाज येतो आणि पाठोपाठ बिबट्या त्या कुत्र्याला त्याच्या जबड्यात पकडून पुन्हा त्याच उंच गेटवर उडी मारून बाहेर जाऊन पसार होत असल्याचं व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना परवीन कासवान यांनी “पाहा तो बिबट्या, इतरांना कुठली संधीच नाही. व्हॉट्सअॅपवरून”, असा संदेश लिहिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून परवीन कासवान यांनी देखील आपल्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवरून आल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social viral vidoe leopard attack pet outside house cctv footage on twitter pmw