मलेशियातील धक्कादायक विमान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची आणि विमानाने जोरदार धडक झाल्याचं दिसत आहे. विमान वाहनांना धडकताच काही क्षणात आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा सर्वत्र दिसत होत्या. या अपघातात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सेलांगोरमध्ये हा अपघात झाला असून त्याची माहिती खुद्द मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ८ जण विमानात होते तर एक जण दुचाकीवर आणि दुसरा कारमध्ये होता.

लँडिंग दरम्यान दुर्घटना –

मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAM) या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनानुसार, दोन क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशांना घेऊन एक लहान विमान मलेशियाच्या सेलांगोर राज्यातील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लँडिंग यशस्वी होऊ शकले नाही आणि विमान महामार्गावरील वाहनांना धडकले. या धडकेत विमानातील सर्व प्रवाशांह कार चालक आणि बाईक चालकाचा मृत्यू झाला आहे.

हेही पाहा- VIDEO: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला लागली आग, राष्ट्रीय महामार्गावर आगीचं तांडव, लोकांची झाली पळापळ

हायवेवर विमानाची टक्कर इतकी जोरदार होती की काही क्षणात तेथील परिसरात मोठमोठे आगीचे लोळ दिसू लागले. तर आकाशात धुराचे साम्राज्य पसरले होते. अपघातानंतर त्या भागातील वाहतूक बंद करण्यात आली होती. काही तास उलटून गेले तरीही आकाशात धुराचे लोट दिसत होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने लँगकावीच्या उत्तरेकडील रिसॉर्ट बेटावरून उड्डाण केले होते आणि ते राजधानी क्वालालंपूरच्या पश्चिमेला सुलतान अब्दुल अजीज शाह विमानतळाकडे जात होते. अपघातग्रस्त विमान जेट व्हॅलेटने चालवले होते.

मलेशियाचे सुलतान आणि विमान वाहतूक मंत्री यांची घटनास्थळी भेट –

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये पहांग येथील एक राज्य विधानसभा सदस्य आणि एका विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचे कारण समजू शकले नाही. विमानाचा अवशेष आणि ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. मलेशियाचे सुलतान अपघातस्थळाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले असून देशाच्या नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनीही अपघातस्थळी भेट दिली आहे. तर अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे.