Viral Video: सोशल मीडियावर सुंदर रिल्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी अनेकदा लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. व्हिडिओ अन् रिल्सकरिता काही लाईक्स मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडतात. सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका धबधब्याच्या मध्यभागी जाऊन व्हिडीओ शुट करण्याच्या नादात दोन मुलींचा पाय घसरतो आणि त्या दोघींही खडकावर जोरात आपटतात. व्हिडीओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.

रीलच्या नादात गमावला असता जीव

व्हिडीओमध्ये दिसते की, एका सुंदर धबधब्याच्या खडकावर उभे राहून दोन तरुणी रिल व्हिडिओ शुट करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहत्या पाण्यातून एका दगडावरून दुसर्‍या दगडावरून पाय ठेवत एक तरुणी जात असते त्याच वेळी दगडावरून तिचा पाय घसरतो अन् ती धाडकन खाली आपटते. सुदैवाने ती एका दगडाला पकडून ठेवते ज्यामुळे ती धबधब्याच्या खडकावरून आणखी खाली घसरत जात नाही. तरुणी तिच्या डोक्याला हात लावताना दिसत आहे, पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला असावा. तिच्या मदतीला दुसरी मुलगी येते अन् तीही त्याच दगडावर पाय ठेवताच जोरात घसरते आणि आपटते. ती काही अंतर खाली घसरत जाते पण ती देखील सुदैवाने वाचते. दोन्ही तरुणी इतक्या जोरात आपटतात ते पाहून काळजात धस्स होते. दोन्ही तरुणी थोड्या आणखी पुढे घसरल्या असत्या तर धबधब्याच्या खडकावरून घसरून थेट दरीत पडल्या असत्या आणि त्यांचा जीव धोक्यात आला असता. सुदैवाने दोघींचाही जीव वाचतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी लोकांनी स्वत:ची सुरक्षितता लक्षात ठेवावी असा इशाराही देत आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला रोष

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. अनेक वापरकर्त्यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि लिहिले की,”सोशल मीडियासाठी अशा धोकादायक ठिकाणी रील बनवणे धोकादायक असू शकते.”

एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “काळजात धस्स झाले हा व्हिडिओ पाहून. रीलच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात का टाकतात?” त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “निसर्गाचा आनंद घेणे चांगले आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे नाही.”

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @PalsSkit नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ लिहिण्याच्या वेळेपर्यंत ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.