अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात ही रेल्वेने होते. खिशाला परवडणारी व सहज सोपी अशी वाहतूक म्हणजे रेल्वे. प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या या रेल्वेने रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. स्वाभाविकत: त्यामुळे नेहमीच तुम्हाला गर्दी दिसते. रेल्वे तिकिटाची किंमतही अगदी क्षुल्लक आणि परवडणारी असते. तरीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात.

अलीकडेच रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी तिकीट तपासणी अभियान सुरू केले. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल-एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. यामार्फत असंख्य फुकट्या प्रवाशांना रेल्वेकडून चांगलाच दट्ट्या बसला. त्याशिवाय या अभियानामुळे रेल्वे प्रशासनाने लाखोंच्या दंडही वसूल केला. दंड होऊनही हे फुकटे प्रवासी ऐकायला तयार नाहीत. अशाच फुकट्या प्रवाशांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तरी तिकिटे काढण्याचे किमान शहाणपण रेल्वे प्रवाशांना येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

अलीकडेच असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत; ज्यात तिकीट नसलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या आरक्षित डब्यांचाही ताबा घेतला आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांनी आपली जागा आधीच बुक केली होती, त्यांची खूप गैरसोय होत आहे. असाच एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये तिकीट न काढता, ट्रेनच्या एसी कोचमध्ये हजारो लोक चढले. वास्तविक, हे प्रवासी पाटणा जंक्शन येथे ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसमध्ये चढले होते.

(हे ही वाचा : पोहण्यासाठी मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात मारली उडी; पुढच्याच क्षणी जे झालं…VIDEO व्हायरल )

या घटनेचा व्हिडीओ ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या विजय कुमार नावाच्या प्रवाशाने त्याच्या X हॅण्डलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, पाटणा जंक्शनवर ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसच्या थर्ड एसी कोचमध्ये हजारो लोक तिकीट न काढता, एकत्र ट्रेनमध्ये चढले. ते पुढे म्हणाले की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ट्रेनमध्ये चढण्यात आणि त्यांच्या बुक केलेल्या जागा शोधण्यात खूप अडचणी आल्या. विजय कुमार यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आठ जागा बुक केल्या होत्या; परंतु अनधिकृत प्रवाशांच्या उपस्थितीमुळे ते केवळ सहा सीटपर्यंत पोहोचू शकले. तिकीट नसलेल्यांबरोबरच जनरल तिकीट असलेलेही डब्यात घुसले होते. त्यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबातील महिलांना बाथरूममध्ये जायचे होते; पण गर्दीमुळे त्यांना जाता येत नव्हते. सगळीकडे लोकांची गर्दी असते. महिलांना बाथरूममध्ये जायचे असते; पण या फुकट्या प्रवाशांमुळे ते शक्य होत नाही. आम्हा प्रवाशांना दिलेल्या मूलभूत सेवांचाही वापर करता येत नसेल, तर सीट्स बुक करून काय उपयोग?

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

व्हिडीओ शेअर करताना विजय कुमार यांनी लिहिले, “एसी-३ कोचचा ताबा सामान्य प्रवाशांनी घेतला आहे. कोणीही कोणत्याही नियमांची पर्वा करीत नाही.” सर्वसामान्यांना नेहमीच त्रास का सहन करावा लागतो? कन्फर्म तिकिटाचा उपयोग काय? व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डब्यात इतकी गर्दी आहे की ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. ट्रेनचा कॉरिडॉर माणसांनी खचाखच भरलेला असतो, असेही त्यांनी रेल्वेला टॅग करीत लिहिले आहे.