सोशल मीडियावर दररोज काही ना काही धक्कादायक आणि आपल्याला थक्क करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेलं प्रकरण जरा हटके आहे. ही बातमी समोर आल्यावर अनेकांचा यावर विश्वास बसत नाही आहे. आपण वृत्तपत्रात अनेक जाहिराती पाहतो, पण अशी जाहिरात तुम्ही कुठेही वाचली नसेल. या जाहिरातीमध्ये असं काय लिहलंय ते पाहुयात.
एका इसमाने एका वृत्तपत्राच्या ‘हरवले आहे’ या सदरात मृत्युपत्र गहाळ झाले असल्याची जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे हे मृत्युपत्र या इसमाचेच आहे. आसामच्या होजाई जिल्ह्यात राहणाऱ्या रणजित कुमार चक्रवर्ती या इसमाने ही जाहिरात दिली होती. या जाहिरातीत सांगितले आहे की ७ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास बाजारात हे मृत्युपत्र हरवले.
या जाहिरातीमध्ये रणजितने आपल्या पत्त्यासह त्या मृत्युपत्राचा नोंदणी क्रमांकही दिला आहे. दरम्यान ट्विटरसह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात तुफान व्हायरल झाली असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने तर म्हटलंय, हा व्यक्ती स्वर्गातून आपले मृत्युपत्र मागत आहे. तर, दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, ‘हे मृत्युपत्र सापडल्यास कुठे पाठवायचे? स्वर्गात की नरकात?’