Viral Video: हल्ली समाजमाध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेमध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थिनींबरोबर ‘वाका वाका’ या दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध गायिका शकीरा हिच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी शिक्षिकेला तिच्या छोट्या विद्यार्थिनीही उत्तम साथ देतात. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @arpita_lucky या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “खूप भारी डान्स.” आणखी एकानं लिहिलंय, “आमच्या वेळी असे शिक्षक का नव्हते?” आणखी एकानं लिहिलंय, “अभ्यासाबरोबर कलेचं शिक्षण… खूप छान”. पुढे एका व्यक्तीनं लिहिलंय, “असे शिक्षण प्रत्येक शाळेत असायला हवे.”