Female professor weds student Video Viral: पश्चिम बंगालमध्ये एका शासकीय विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यापीठातील एका वरिष्ठ महिला प्राध्यापिकेने पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी भरवर्गात लग्नगाठ बांधली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने चौकशी सुरू केली आहे. नादिया जिल्ह्यातील हरिनघाट तंत्रज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात सदर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे महाविद्यालय मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला प्राध्यापिका पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याशी विधिवत लग्न करत आहे. पारंपरिक बंगाली वधूप्रमाणे प्राध्यापिका नटली आहे. विद्यार्थ्याने शिक्षिकेला सिंदूर लावत गळ्यात फुलांची माळ घातली. ज्या वर्गात मानसशास्त्राचे धडे दिले जात होते, त्याच वर्गात हा लग्न समारंभ पार पडला. यावेळी इतर विद्यार्थी लग्नाचे रेकॉर्डिंग करत नववूध वरांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

महाविद्यालयाकडून चौकशीचे आदेश

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख असलेल्या प्राध्यापिका आणि लग्न झालेला विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. या प्रकारावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर आता विद्यापीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन करून याची चौकशी सुरू केली आहे. तसेच प्राध्यापिकेकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे.

हरिनघाट तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू तपाश चक्रवर्ती यांनी सांगितले की, आम्ही महिला प्राध्यापिकेशी बोललो आहोत. प्राध्यापिकेने सांगितले की, हा त्यांच्या प्रॅक्टिकल सेशनचा एक भाग होता. पण आम्ही त्यांच्या उत्तराने समाधानी नाही आहोत. त्यामुळे आम्ही चौकशी सुरू केली आहे. प्राध्यापिकेला सध्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

प्राध्यापिकेने काय म्हटले?

दरम्यान लग्न केल्याचा आरोप केलेल्या प्राध्यापिकेने म्हटले की, हे लग्न मनो-नाट्य प्रकाराचा एक भाग होते. काही संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वर्गात हा प्रकार केला गेला. हे खरे लग्न नव्हते. तर अभ्यासाशी निगडित एक प्रयोग होता. सदर व्हिडीओ फक्त आमच्या प्रात्यक्षिकासाठी काढला गेला होता, तो बाहेर कुणालाही दाखविण्याची परवानगी नव्हती. मात्र माझी अनुमती न घेता तो कुणीतरी व्हायरल केला.

दरम्यान एक्सवर अबीर घोषाल नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. काहींनी या लग्नाला कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले आहे, पण लग्न करण्याचे स्थळ चुकीचे निवडले असल्याची टीका केली आहे. तर काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे. हा फक्त शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग होता, हे लग्न खरे नाही, असे काही जणांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal senior female professor weds student in classroom probe ordered as video goes viral kvg