Human Sweat-Infused Rice Balls आपल्या पैकी अनेकांनी गाजलेला हॅरी पॉटर हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट अद्भुत होती. चित्रपटाचे कथानक हे जादू या संकल्पनेभोवती विणलेले असल्याने ते साहजिकच होते. या चित्रपटातील कॅण्डीजचे दृश्य लोकप्रिय आहे. या वेगवेगळ्या चवीच्या कॅण्डीज मध्ये झुरळ, उलटी असा विचित्र चवींचा समावेश होता. चित्रपट काल्पनिक कथानकावर आधारित असल्याने त्यातील दृश्यही काल्पनिकच होती. परंतु सध्या अशाच एका विचित्र चवीचा पदार्थ जगभरा ट्रेण्ड होत आहे. हा पदार्थ जपानमधील प्रसिद्ध ‘ओनिगिरी’ आहे. या पदार्थात स्त्रियांच्या काखेतील घाम मिसळला जातो. हा पदार्थ नक्की काय आहे? आणि त्या मागची नेमकी संकल्पना काय हे जाणून घेणे रंजक ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: श्रीकृष्णाच्या गोवर्धन पर्वताजवळ सापडले तब्बल २५०० वर्षांपेक्षा जुने ‘यज्ञकुंड’; पुरातत्त्वीय उत्खननात नेमके काय सापडले?

काखेचा वापर मोल्ड सारखा

जपानमधील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे ओनिगिरी, यालाच राईस बॉल्स असेही म्हणतात. पारंपरिकरित्या हा पदार्थ हाताचा वापर आणि बांबूच्या लहान चटईचा वापर करून तयार करण्यात येत असे. कालपरत्त्वे बांबूच्या चटईची जागा प्लास्टिकच्या साच्यांनी घेतली. परंतु, या सर्वांच्या पलीकडे हा पदार्थ तयार करण्याची एक वेगळीच पद्धत सध्या चर्चेत आहे. काही तरुण महिला आचारी त्यांच्या काखेचा वापर हा पदार्थ तयार करण्यासाठी करत आहेत. काखेत राईस बॉल ठेवून काखेचा वापर मोल्ड सारखा केला जातो. सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या या अनोख्या पद्धतीमुळे जपानी खाद्यसंस्कृतीला नवे वळण मिळाले आहे. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, अन्नाच्या संपर्कात येणारे सर्व घटक आणि शरीराचे अवयव प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जातात.

ओनिगिरी म्हणजे नक्की काय आहे?

ओनिगिरी हा लोकप्रिय जपानी पदार्थ आहे. यात तांदळाचा गोळा किंवा शंकू तयार केला जातो. त्यात सारण म्हणून इतर वेगवेगळे पदार्थ भरण्याची पद्धत आहे. भरलेला भाताचा गोळा नोरी म्हणजेच सीव्हीड मध्ये गुंडाळण्यात येतो. ओनिगिरी हे नाव निगिरु या जपानी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ “आवळणे” किंवा “पिळणे” असा होतो. हा पदार्थ तयार करताना (राईस बॉल) हाताने दाबला जातो. या प्रक्रियेला निगिरिमेशी असेही म्हटले जाते आणि त्यावरूनच ओनिगिरी हे नाव आले आहे. ओनिगिरीला काही ठिकाणी ओमुसुबीही म्हटले जाते. याही शब्दाचा अर्थ भाताचा गोळा दाबून तयार केलेला पदार्थ, जो सहज हाताळता येतो असा आहे.

अधिक वाचा: तुम्हाला डार्क चॉकलेटस् आवडतात का? कोण करतंय या बाजारपेठेवर राज्य?

पूर्वी या पदार्थाचा आकार गोल होता. कालांतराने त्रिकोणी आकार देण्यात येऊ लागला. ओनिगिरी थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीने खाता येतो. जपानमधील ओनिगिरी या पदार्थाचा वापर आणि इतिहास २००० वर्षांहूनही अधिक आहे. इशिकावा प्रीफेक्चरमधील पुरातत्व स्थळावरून या पदार्थाचे प्राचीन पुरावे नोंदविण्यात आले आहेत. इसवी सनाच्या ७ व्या ते ११ व्या शतकादरम्यान राजकीय वर्तुळात हा पदार्थ महत्त्वाचा आणि लोकप्रिय होता. या कालखंडात या पदार्थाची धार्मिक भेटवस्तूच्या स्वरूपात देवाणघेवाण होत होती. १८८५ साली जपानच्या पहिल्या रेल्वे मार्गावर जो पदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली होती, तो पदार्थ ओनिगिरी हाच होता. त्यामुळे जपानच्या खाद्य संस्कृतीत या पदार्थाला महत्त्वाचे स्थान आहे.

सध्या ट्रेण्डमध्ये असलेली ओनिगिरीची पद्धत काय आहे?

सध्या ट्रेण्डमध्ये असणाऱ्या पद्धतीमध्ये पारंपरिक पदार्थच वापरले जातात, परंतु हा पदार्थ मोल्ड करण्याची पद्धत वेगळी आहे. या नवीन ट्रेण्डिंग पद्धतीमध्ये शेफ हातांऐवजी त्यांच्या बगलेचा वापर करून भाताच्या गोळ्यांना आकार देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा काखेचा वापरकरून तयार करण्यात आलेला पदार्थ निवडक रेस्टॉरंट्समध्ये नेहमीच्या ओनिगिरीपेक्षा दहापट जास्त किमतीत विकला जातो. या बगल-मोल्डेड राईस बॉल्सवर ग्राहकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काही खाद्यप्रेमींनी चवीत कोणताही फरक जाणवत नसल्याची तक्रार केली आहे, तर काहींना ही संकल्पना वैचित्र्यपूर्ण आणि अस्वस्थ करणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर इतर काहींनी या पद्धतीविषयी पारदर्शकता दाखवल्याबद्दलही प्रशंसा केली आहे. काही विद्वानांनी काखेतील घामात फेरोमोन असल्याने त्याचा मानवी भावनांवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. भाताचे गोळे तयार करणाऱ्या स्त्रिया कठोर आणि काळजीपूर्वक स्वच्छतेच्या सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करतात. अन्नाच्या संपर्कात येणारे शरीराचे अवयव पूर्णपणे निर्जंतुक करतात, असे SCMP ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. हा पदार्थ तयार करताना येणारा घाम हा एखादा व्यायाम करून आणला जातो. त्यानंतर शेफ हात वापरण्याऐवजी डिश तयार करण्यासाठी त्यांच्या बगलेचा वापर करतात. काही रेस्टॉरंट्स अगदी उघडपणे या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करतात, त्यामुळे ग्राहकांना हे अनोखे तंत्र पाहताही येते.

त्याची चव कशी आहे?

SCMP नुसार, ही नवीन पद्धत वापरू पाहणाऱ्या एका व्यक्तीने राईस बॉल्सच्या नेहमीच्या चवीशिवाय याला वेगळी किंवा विशिष्ट चव नाही असे मत व्यक्त केले आहे.

अधिक वाचा: Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पडसाद

काहीही असले तरी या नवीन पद्धतीसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार वादविवाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लोकांना मते व्यक्त करायला वेळ लागला नाही. प्रतिक्रिया वैविध्यपूर्ण आहेत, या पद्धतीच्या समर्थकांनी जोपर्यंत स्वच्छतेची मानके कायम ठेवली जात आहेत तोपर्यंत असे प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही असा युक्तिवाद केला आहे. तर इतरांनी या पद्धतीविषयी शंका आणि चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या शेफला काही आजार असेल तर काय? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is onigiri have you tried this infused with sweat why is this topic trending svs