Mumbai Lalbaugcha Raja Ganesh Visarjan: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होत आहे. यामध्ये मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका या विशेष आकर्षण ठरतात. त्यातही लालबागच्या राजाचा थाट हा काही वेगळाच असतो. लालबागचा राजा ज्या मार्गाने विसर्जनासाठी निघतो त्या मार्गावर अनेक ठिकाणी त्याच्यावर पुष्प वर्षाव केला जातो. मात्र, मुंबईतलं एक असं ठिकाण आहे जिथून जाताना लालबागच्या राजाचा ताफा हा काही वेळासाठी थांबतो. ते ठिकाण आहे भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद. ही परंपरा मशिदीतील सदस्य आणि लालबाग मंडळ दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून जपली जात आहे.
का थांबतो लालबागचा राजा या मशिदीसमोर?
लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान भायखळ्यातील हिंदुस्तानी मशिदीसमोर राजाचा ताफा थांबतो. हा एक उल्लेखनीय क्षण असतो. भाविक ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करतात आणि मशिदीतील सदस्य मोठ्या उत्साहाने मिरवणुकीचे स्वागत करतात. यावरून असेच दिसून येते की, श्रद्धा वेगवेगळी असू शकते, मात्र करूणा आणि आदर सर्व समुदायांना एकत्रित आणतात.
लालबागच्या राजाचा इथे थांबण्याची परंपरा २०च्या दशकाच्या मध्यात सुरू झाली. त्यावेळी स्थानिक मुस्लिम गणेश मंडळाला विसर्जनादरम्यान मार्ग मोकळा करून देणे आणि इतर व्यवस्था करणे अशाप्रकारे पाठिंबा देत. हीच कृती पुढे परंपरेत रूपांतरित झाली. लालबागचा राजा या मशिदीसमोर आला की हा स्थानिक मुस्लिम समुदाय राजाला फुले अर्पण करतो आणि हिंदू-मुस्लिम एकमेकांना मिठाई वाटतात. अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा मुंबईतील एकतेचे दर्शन घडविणारी आहे.
एक्सवर मानसी नावाच्या एका तरूणीने मागील वर्षाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाल्यावर त्याच्यावर हार, फुलांचा वर्षाव केला जातो. केवळ भायखळ्यातील ही मशीदच नव्हे तर वाटेत अनेक मुस्लिम बांधव राजाचे मनोभावे स्वागत करतात. त्यावेळी या सणाच्या निमित्ताने मुंबईत असलेली विविधतेतील एकता दिसून येते. ढोलताशा वाजत असताना, ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष होत असताना दुसरीकडे या मशिदीसमोरचा थांबा सर्व भाविकांसाठी एक निराळा क्षण ठरतो.