Women’s day history: महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांची समाजातील ओळख अधोरेखित करण्यासाठी महिला दिन जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी ८ मार्चला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. महिलांना भेटवस्तू दिल्या जातात. पण, हा दिवस साजरा करण्यामागचे मूळ कारण काय हे तुम्हांला माहीत आहे का? त्यासाठी आपल्याला महिला दिनाचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.
जगातील बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक समाजव्यवस्था पाहायला मिळत असत. सुरुवातीला समान अधिकार असणारा महिलावर्ग हळूहळू मागे पडू लागला. त्यांचे हक्क त्यांच्याकडून काढून घेतले गेले. अनाठायी अनेक गोष्टी त्यांच्यावर लादल्या गेल्या. त्यामध्ये अनेक अपवाददेखील होते. जसजशी मानवी समाजाची प्रगती होत गेली, तसतशा महिलादेखील प्रगती करू लागल्या. आजच्या युगातील महिला या चूल-मूल सांभाळत ऑफिसची जबाबदारीही पेलत आहेत. खेळ-मनोरंजन ते राजकारण-संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्या पुरुषांची बरोबरी साधत आहेत. काही क्षेत्रांमध्ये महिला त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत आहेत. समाजात सुधारणा होण्यासाठी महिलावर्ग अजून प्रगत होण्याची गरज आहे. महिलांचा समाजामधील सहभाग वाढावा, तसेच त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
महिला दिनाची सुरुवात कधी झाली?
पहिल्या महायुद्धापूर्वी महिलांना घराबाहेर पडून काम करण्याची परवानगी नव्हती. या काळात पुरुष सैन्यामध्ये असल्याने विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी महिला उमेदवारांना संधी दिली जाऊ लागली. कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जात होते. कामाची वेळही अधिक असल्याचा महिला कर्मचारी आरोप करीत होत्या. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये ही स्थिती होती.
कामाच्या ठिकाणी असलेल्या पितृसत्ताक विचारसरणीविरोधात १९०८ मध्ये अमेरिकेत कामगार चळवळ झाली. सुमारे १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून, हक्कांसाठी आवाज उठवला. कामाचे तास कमी करून वेतन वाढवले जावे, अशी मागणी नोकरदार महिलांनी केली. त्यांनी मतदानाच्या अधिकाराचीही मागणी केली. त्यानंतर १९०९ मध्ये या चळवळीच्या एक वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. ८ मार्च रोजी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे अमेरिकेत हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हा ८ मार्च १९७५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. १९७७ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महिला दिन का साजरा केला जातो?
महिलांना समान संधी मिळावी, महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी, तसेच समाजामध्ये महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढावी यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. सध्या बऱ्याचशा महिला या प्रगती करीत असल्या तरीही या वर्गातील काही महिलांना समान सन्मान आणि अधिकार मिळालेले नाहीत. त्यांच्या हक्कांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी संयुक्त राष्ट्राद्वारे हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ थीम
दरवर्षी जागतिक महिला दिन विशेष थीमसह साजरा करण्याची पद्धत आहे. गेल्या वर्षी महिला दिनाची थीम ‘inspire inclusion’ या संकल्पनेवर आधारित होती. यंदा महिला दिनाची थीम ‘Accelerate Action’ ही आहे.
महिला दिन २०२५ (women day 2025) गूगलवरही ट्रेंड होत आहे. गेल्या ४८ तासांमध्ये २० हजारांहून अधिक लोकांनी हा की-वर्ड सर्च केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd