उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा भाजपाचे सरकार सत्तेत आलं आहे. एकीकडे बुलडोझरची कारवाई जोरात सुरू असताना दुसरीकडे ठिकाणांची नावे बदलण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत यांनी जिल्ह्याचे नाव बदलून पांचालनगर करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदाराने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री योगींना लिहिलेल्या पत्रात मुकेश राजपूत यांनी म्हटले आहे की, फर्रुखाबादचा इतिहास फार प्राचीन काळाचा आहे. गंगा, रामगंगा आणि काली नदी या तीन नद्यांच्या मध्ये वसलेल्या फार्रुखाबादला त्याकाळी पांचाल क्षेत्र म्हणत. हे शहर पूर्वी पांचाळ राज्याची राजधानी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा खासदार मुकेश राजपूत यांनी सीएम योगींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतातील पौराणिक संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने मुघल शासक फर्रुखशियारने १७१४ मध्ये या ऐतिहासिक शहराचे नाव बदलून फर्रुखाबाद केले होते. मुकेश राजपूत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचे फर्रुखाबाद जिल्ह्याचे नाव बदलून पांचालनगर/अपराकाशी करण्याचे आवाहन केले आहे.

योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अलाहाबाद आणि फैजाबाद जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली होती. अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज, तर फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले आहे. याशिवाय अनेक स्थानकांची नावेही बदलण्यात आल्याने त्यावरून राजकारण तापले होते. जागांची नावे बदलल्यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi government to give new identity to farrukhabad rmt